देशातील ५ राज्यांत झालेल्या निवडणुकीत भाजपाने तीन राज्यात बहुमत मिळवले असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात होतं. त्यामुळेच, या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यातच, महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बंडानंतरही देशात भाजपची प्रतिमा डागळल्याची टीका विरोधकांकडून होत होती. त्यातच, शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मध्य प्रदेशच्या पांढुर्णा दौऱ्यावर असताना, ४ राज्यात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं विधान केलं होता. आता, भाजपाकडूनआदित्य ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी, व्यासपीठावर काँग्रेस नेते कलमनाथ हेही होते. यावेळी, भाषण करताना आदित्य ठाकरेंनी ५ राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं होतं. ४ राज्यांत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, मी मध्य प्रदेशमध्ये कलमनाथ यांच्या शपथविधीची तारीख आणि वेळ विचारायला आलोय, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला केवळ एका राज्यात बहुमत मिळालं आहे. तर, भाजपाने तीन राज्यात सत्ता मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळेच, भाजपा आमदार राम सातपुते यांनी आदित्य ठाकरेंचा तो जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
आमदार राम सातपुते यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, आदित्य ठाकरे मध्य प्रदेशातील कार्यक्रमात भाषण करत आहेत. त्यावेळी, लिहून घ्या, ४ राज्यांत काँग्रेसंच सरकार येणार, असं भाकीतच करताना पाहायला मिळतात. या व्हिडिओसह सातपुते यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे. भाजपच्या ३ राज्यातील विजयाचं एन्जॉय करा... असं कॅप्शन आमदार सातपुते यांनी दिलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आमदाराने आदित्य ठाकरेंच्या विधानाची खिल्लीच उडवल्याचं दिसून येतं.