लेखक-दिग्दर्शक ज्योतिराम कदम यांचे पुण्यात निधन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:06 AM2021-05-06T04:06:45+5:302021-05-06T04:06:45+5:30
मुंबई : मराठी रंगभूमीवर बालनाट्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक ज्योतिराम कदम यांचे ३० एप्रिल रोजी ...
मुंबई : मराठी रंगभूमीवर बालनाट्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक ज्योतिराम कदम यांचे ३० एप्रिल रोजी पुणे येथे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मुंबईतील परळच्या शिरोडकर शाळेत १४ वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. इथेच त्यांच्यात बालनाट्ये लिहिण्याची व सादर करण्याची आवड निर्माण झाली.
आजवर त्यांनी मराठी व हिंदी मिळून चाळीसहून अधिक बालनाट्ये लिहिली आहेत. केल्याने होत आहे रे, काळाची ओळख, पैकीच्या पैकी, नवी पहाट, सारे शिकूया पुढे जाऊया, माझं पाखरु, जनसेवा हीच ईश्वरसेवा, नारद झाला गारद आदी त्यांची नाटके अजरामर झाली आहेत.
'केल्याने होत आहे रे' या त्यांच्या बालनाट्याला १९८२ या वर्षाचा आकाशवाणीचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा पुरस्कार प्राप्त झाला होता. बालचित्रवाणीमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध करताना त्यांनी पाचशेहून अधिक ध्वनिफिती व चित्रफितींची निर्मिती केली. साहित्य संस्कृती मंडळ, तसेच बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे ते सदस्य होते. गेली पस्तीस वर्षे सातत्याने बालनाट्य स्पर्धा घेणाऱ्या रविकिरण संस्थेचे ते सल्लागार होते.