आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात गिरवणार अच्युत पालव देवनागरी सुलेखनाचा कित्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:30 AM2019-05-17T04:30:58+5:302019-05-17T04:35:01+5:30
सॅन फ्रान्सिको येथे आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफीज इन कॉर्न्व्हसेशन या प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
मुंबई : सॅन फ्रान्सिको येथे आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफीज इन कॉर्न्व्हसेशन या प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ७ जून रोजी जगभरातील सुलेखनकारांच्या कलाकृती मांडण्यात येतील. या प्रदर्शनात अच्युत पालव देवनागरी सुलेखनाचा कित्ता गिरवणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या दिवशी अच्युत पालव यांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. जगातील निवडक चित्रांची ‘मास्टर्स’ विभागात मांडणी करण्यात आली आहे. १२ जून रोजी अच्युत पालव यांचा मास्टर क्लास आयोजित करण्यात आला असून भारतीय सुलेखनाच्या विविध शैली कुंचल्यातून सादर करणार आहेत. या वर्गात अमेरिकन कॅलिग्राफर देवनागरी लिपीकडे कशा पद्धतीने बघत आहेत तसेच कशा पद्धतीने लिहिणार आहेत, हा एक कुतूहलाचा विषय असणार आहे.
अमेरिकेबरोबरच सप्टेंबरमध्ये कोरिया येथे भरणाऱ्या ११ व्या वर्ल्ड कॅलिग्राफी (बिनाले) प्रदर्शनातसुद्धा अच्युत पालव यांच्या मराठमोळ्या अक्षराने नटलेल्या अक्षरचित्रांची निवड झाली आहे. सातत्याने मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन सुलेखनात नवनवे प्रयोग करणारे पालव यांनी यंदा अमेरिकेत संत तुकारामांच्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या ओवीचा वापर करून अक्षररचना केली आहे, तर कोरियात वसुधैव कुटुंबकम् आणि ज्योतीने तेजाची आरती या सुभाषितांचा वापर करून रचना केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पॅरिस येथे जगातल्या सहा कॅलिग्राफर्समध्ये अच्युत पालव यांच्या कामाची निवड झाली तेव्हा पालव यांनी पॅरिसच्या भिंतींवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, मंगेश पाडगावकर, बहिणाबाई, ना.धों. महानोर आणि इतर नामवंत कवींच्या रचनांचा वापर करून ‘गर्जते मराठी’ हे जगाला दाखवून दिले होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रदर्शनात पालव यांच्याबरोबर त्यांच्या काही विद्यार्थ्यांचेही काम डिजिटल विभागात दाखविले जाणार आहे.