Join us

विधि परीक्षेचा गोंधळ कायम, शेवटच्या क्षणी प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 2:38 AM

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत.

मुंबई : विधि शाखेच्या द्वितीय सत्राची (वर्षे ३) परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षेतील नवे गोंधळ रोज नव्याने समोर येत असून, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा बेजबाबदारपणा या निमित्ताने समोर येत आहे. ७ जानेवारी रोजी या शाखेची मालमत्ता हस्तांतरण कायदा या विषयाची परीक्षा होती. मात्र, पेपरच्या शेवटच्या अर्ध्या तासांत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांकडे या संदर्भात तक्रारी केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शेवटचे वर्ष असल्याने चुकीच्या प्रश्नामुळे त्याची गुण कमी होऊ नयेत, याची दखल विद्यापीठाने घ्यावी. यासाठी त्यांना अतिरिक्त गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. २ दिवसांपूर्वी विधि अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. १०० गुणांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेर असल्याचे आढळून आले.या संदर्भात बोलताना मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे म्हणाले की, विधि विभागाच्या विद्यार्थ्यांकडून ही तक्रार आल्यानंतर त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या. खरे म्हणजे प्रश्नांमध्ये दुरुस्त्या होत्या, ते बाहेरील नव्हते. दुरुस्त्या पुन्हा महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची योग्य ती दखल विद्यापीठ घेणार आहे. 

टॅग्स :मुंबईपरीक्षा