मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तसेच मुंबई विभागाच्या निकालात देखील 19.68 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी ही टक्केवारी 77. 04 इतकी होती.
मुंबई विभाग इतर 9 विभागीय मंडळात चौथ्या स्थानावर असून या क्रमवारीत एका स्थानाची बढती झाली आहे. मुंबई विभागातून 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यातील 3 लाख 20 हजार 284 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागात 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लक्ष 8 हजार 49 इतकी आहे. तर 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून 1 लाख 17 हजार 819 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई ,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामूळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या.मात्र, कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले.