दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:07 AM2021-07-14T04:07:56+5:302021-07-14T04:07:56+5:30
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील शाळांकडून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील शाळांकडून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठीची ९ जुलैपर्यंतची मुदत संपली आहे. आता दहावीच्या निकालाचे राज्य शिक्षण मंडळ स्तरावरील काम सुरु असून, त्यावरील अंतिम टप्प्यातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्र प्रसिद्ध करण्यात आले. राज्य मंडळाने सर्व शाळांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. राज्य मंडळाने दिलेल्या संगणकीय प्रणालीत ऑनलाईन गुण भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जमा करून घेतली गेली. मात्र, त्यात नियोजनाचा अभाव दिसून आला. लॉकडाऊन काळात पुनर्परीक्षा देणाऱ्या आणि बाहेरून खासगीरित्या बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. या काळात त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने त्यांना गुणदान करायचे कसे, असे प्रश्न शाळांसमोर उभे होते. दरम्यान, राज्य मंडळाकडून या अडचणी सोडवल्या जात आहेत.
मुंबई विभागातील ९ जुलैच्या आधीच्या माहितीप्रमाणे, एकूण ३,५६,८२१ विद्यार्थ्यांचे निकाल पूर्ण झाले असून, संगणक प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आले आहेत. १,३६८ विद्यार्थ्यांचे निकाल अपूर्ण दाखविण्यात आले होते तर ३,६५९ विद्यार्थ्यांचे निकाल पूर्ण झाले असले तरी त्यांची निश्चिती करण्यात आली नव्हती. एकूणच मुंबई विभागातील ९८.६१ टक्के निकालाचे काम पूर्ण तर १.०१ टक्के निकालाचे काम अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली होती.
मूल्यांकनात चुका काय ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला सुरुवात झाली असून, ही मुदत ३० जूनला संपुष्टात आल्यानंतर २ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, खासगीरित्या बसणाऱ्या आणि पुनर्परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची मागची निकालपत्र नसणे, यामागील परीक्षांचे गुण नसणे असे प्रकार संगणक प्रणालीत दिसल्याने शिक्षण मंडळाकडून निकाल अपूर्ण ठरविण्यात आले. शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना हे निकाल पूर्ण करून, चुकांमध्ये सुधारणा करून देण्यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती.
मुख्याध्यापक म्हणतात :
शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल त्यांच्यापर्यंत पोहोचून निकालाचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने चुका टाळता येतील, याची कटाक्षाने काळजी घेण्याची सूचना आम्ही शिक्षकांना दिली होती. जवळपास सर्व शाळांच्या निकालाचे शाळास्तरावरील काम पूर्ण झाले आहे. अंतिम निकालाची कार्यवाही राज्य शिक्षण मंडळाकडून लवकर होणे अपेक्षित आहे.
- पांडुरंग केंगार, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना, मुंबई
-------
ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आधी मिळत नव्हते, त्यांना पुन्हा-पुन्हा संपर्क करून त्यांच्या आधीच्या गुणपत्रकांचा शोध घेऊन निकाल पूर्ण केले आहेत. कोणाही विद्यार्थ्याच्या बाबतीत गुणदानात अन्याय होऊ नये आणि त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, हीच अपेक्षा होती. त्यामुळे निकालासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा उपयोग झाला.
- चित्रा काणे, शिक्षिका
विभाग - मुले - मुली - तृतीयपंथी - एकूण
मुंबई - १९०७३८ - १६९१७४ - २३ - ३५९९३५