Join us

अकरावीच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकात चूक, विद्यार्थ्यांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 6:13 AM

दोन समान ध्रुवांमध्ये आकर्षण की प्रतिकर्षण?;विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मुंबई : अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि महाविद्यालये सुरू असताना अकरावीची पुस्तकेही बाजारात उपलब्ध झाली मात्र चुकांसह. अकरावीच्या विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकात चुकीचा मजकूर देण्यात आल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

दोन ध्रुवांमधील बलाच्या नियमाचे स्पष्टीकरण देताना ही चूक पाठ्यपुस्तक मंडळाकडून झाली आहे. त्यामुळे नियम, गुणधर्म, गृहीतके ज्याच्यावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अवलंबून आहे त्यातच चुका झाल्या. त्या चुका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असतील तर गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून व्यक्त होत आहेत. अकरावीच्या भौतिकशास्त्र पुस्तकातील दहावा धडा इलेक्टोस्टॅटिक्समध्ये ही चूक आहे. दोन समान ध्रुवांमध्ये आकर्षण असते तर परस्परविरोधी ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते, असे स्पष्टीकरण दोन ध्रुवांमधील बलाचे वर्णन करताना दिले. प्रत्यक्षात हा नियम परस्पर उलटा आहे. दोन परस्परविरोधी ध्रुवांमध्ये आकर्षण तर समान ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते असा हा मूळ नियम आहे. जर असे चुकीचे नियम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहेत.

शिक्षण मंडळ आणि बालभारतीने पुस्तके बाजारात आणण्यापूर्वी विषय समितीशिवाय आणखी एका तज्ज्ञ समितीकडून मजकुराची पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. यासंदर्भात बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :शिक्षणमुंबईशिक्षण क्षेत्र