बारावीच्या निकालाचे मूल्यमापन धोरण गुलदस्त्यातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:05 AM2021-06-23T04:05:58+5:302021-06-23T04:05:58+5:30
अंतिम निर्णयाची प्रतीक्षा; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ...
अंतिम निर्णयाची प्रतीक्षा; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बारावी मूल्यांकन धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील बारावीच्या निकालाचे धोरण केव्हा अंतिम होणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षणमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव सादर होऊन त्यावर निकालाची अपेक्षा होती. दरम्यान, सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने दहावीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली, त्याचा तुलनात्मक अभ्यास करून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारावी निकालाचे धोरण अद्याप गुलदस्त्यातच असून त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.
राज्य शिक्षण मंडळ अंतिम करीत असलेल्या बारावीच्या मूल्यमापन धोरणात अकरावी आणि बारावीच्याच गुणांचाच विचार केला जाण्याची शक्यता जास्त असून त्यासाठी अकरावी-बारावीच्या गुणांचे ७०:३० किंवा ६०:४० चे सूत्र वापरले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सीबीएसई मूल्यांकनाच्या धर्तीवर मूल्यमापन पद्धतीचे सूत्र ठरवायचे झाल्यास त्यात दहावीच्या गुणांचा अंतर्भावही मंडळाला करावा लागेल. मात्र काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आणि तज्ज्ञांचा याला विराेध आहे. अकरावी, बारावीत अभ्यासाला असणारे विषय हे दहावीपेक्षा पूर्णतः वेगळे असल्याने त्या गुणांचा अंतर्भाव निकालात केल्यास ते बारावीनंतरच्या शिक्षणाच्या दृष्टीने अयोग्य ठरेल, असे मत मांडले.
दरम्यान आज, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणावर चर्चा होण्याची शक्यता असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
* शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यावरही चर्चेची शक्यता
कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असून ऑनलाइन शिक्षण पुन्हा प्रत्यक्षात म्हणजे ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची मागणी सातत्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरक्षिततेची सगळी काळजी घेऊन कशा आणि कुठे, केव्हापासून सुरू करता येतील? सुरुवातीला कोणते वर्ग आणि विद्यार्थ्यांना बोलावता येईल, या संदर्भातील विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
..................................