यास चक्रीवादळाचा (Yaas Cyclone) सर्वात मोठा तडाखा पश्चिम बंगालला बसला असून, तेथील तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. या चक्रीवादळामुळे असंख्य झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले व हजारो गावातील वीज गेली आहे. ओडिशानंतर यास उद्या, गुरुवारी झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता असून, तिथे अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र लाखो नागरिकांचे वादळाआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
अनेक विमाने रद्द
मुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी सहा विमाने रद्द करण्यात आली आहेत. भुवनेश्वर विमानतळ २५ ते २७ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर झारसुगुडा २६ ते २७ मे पर्यंत बंद ठेवण्यात आले. यास चक्रीवादळ गुरुवारी झारखंडमध्ये धडकणार असल्याने सिंगभूम येथील पूर्व व पश्चिम भागातील सुमारे सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात ओडिशातील धामरा बंदर ते बालासोरच्या दरम्यानच्या प्रदेशास यास चक्रीवादळाचा बुधवारी सकाळी जोरदार तडाखा बसला. या परिसरात ताशी १३५ ते १४५ किमी इतक्या वेगाने यास चक्रीवादळ धडकले. त्यात उत्तर ओडिशातील किनारपट्टीवर असलेल्या कित्येक घरांचे तसेच पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे.