यादवांच्या चालकाने दिली काळ्या पैशांची टीप; लावायचा होता खरा सापळा, साथीदारांनी स्वतःच रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:57 PM2023-08-03T13:57:00+5:302023-08-03T13:57:21+5:30
‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे बनावट एसीबीचे अधिकारी बनून सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या कांतीलाल यादव यांच्या घरावर बनावट छापा पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केल्यानंतर मंगळवारी बाराव्या आरोपीला अटक केली आहे.
नवी मुंबई : बनावट एसीबीच्या छाप्याचे शिकार झालेल्या कांतीलाल यादव यांच्याकडे, चालकाची नोकरी केलेल्या तरुणाला रबाळे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्यामार्फत यादवांकडे कोट्यावधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप गुन्हेगारांपर्यंत पोहोचली होती.
‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे बनावट एसीबीचे अधिकारी बनून सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या कांतीलाल यादव यांच्या घरावर बनावट छापा पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केल्यानंतर मंगळवारी बाराव्या आरोपीला अटक केली आहे.
सुभाष कदम असे त्याचे नाव असून त्याने काही महिने यादव यांच्याकडे चालकाची नोकरी केली होती. त्यामुळे यादव यांच्या घरात मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती असल्याची त्याला माहिती होती. ही माहिती त्याने स्वप्नील नावाच्या मित्राला सांगितली असता स्वप्निलने इतर तिघांसोबत मिळून यादव यांच्या घरावर बनावट छापा टाकण्याचा कट रचला होता. त्यासाठी टोळीत जे सहभागी होतील.
त्यांना कमिशन तर इतरांना मोठा हिस्सा दिला जाणार होता. प्रत्यक्षात मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी ऐवज हाती लागल्याने सर्वांची निराशा झाली होती. या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यातून अधिक माहिती समोर येईल असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मदत नाकारली, म्हणून घेणार होता बदला -
कोपरखैरणेत राहणारा सुभाष कदम हा यादव यांच्याकडे काम करत असताना एका दुर्घटनेत त्याचा मुलगा खूप प्रमाणात भाजला होता. त्याच्यावर उपचारासाठी त्याने यादव यांच्याकडे पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी ते नाकारल्याने पैसे असूनही मदत न केल्याचा राग त्याला आला होता. याच भावनेतून त्याने नोकरी सोडल्यानंतर यादव यांच्या बेहिशोबी संपत्तीची माहिती शासकीय यंत्रणेला देऊन त्यांच्या घरी छापा टाकायला लावायचा त्याचा उद्देश होता. मात्र, योग्य मार्ग माहीत नसल्याने तो ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी करत असे. त्याचप्रमाणे पोलिसांना पाहिजे असलेल्या स्वप्निल नावाच्या मित्राला त्याने सर्व प्रकार सांगितला होता परंतु स्वप्निलनेच इतरांसोबत मिळून यादवांच्या घरावर छाप्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.