यादव प्रकरणात वाझेचा सहभाग?
By admin | Published: May 3, 2017 03:47 AM2017-05-03T03:47:38+5:302017-05-03T03:47:38+5:30
माहिती अधिकाराखाली विविध बिल्डरांकडून खंडणी उकळणाऱ्या डॉक्टर यादवला एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी
विरार : माहिती अधिकाराखाली विविध बिल्डरांकडून खंडणी उकळणाऱ्या डॉक्टर यादवला एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी (सध्या निलंबित) सचिन वाझे यांनी पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचे उघडकीस आले आहे. तसे जबाब तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी वसई न्यायालयात दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
माहिती अधिकाराखाली बिल्डरांची गोपनीय माहिती मिळवून खंडणी उकळणाऱ्या यादवविरोधात वसई परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खंडणीची रक्कम स्वीकारताना त्याचा सहकारी अमोल पाटील याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या प्रकारानंतर यादव फरार झाला होता. त्याला गाझियाबाद येथून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत लांघी यांच्या पथकाने ताब्यात घेऊन वसई न्यायालयात हजर केले असता त्यास ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यादव याने या प्रकरणात हाय प्रोफाईल कनेक्शन असल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते धनंजय गावडे यांनाही स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने चौकशीसाठी बोलाविले आहे. परंतु अद्याप त्यांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. (वार्ताहर)