Join us

यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात, प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 9:10 AM

Yamini Jadhav : स्वतःचे एक कोटी रुपये त्यांनी एका शेल कंपनीकडून कर्ज घेतल्याबद्दल दाखविले असल्याने त्याबद्दल आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे अहवाल दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी धोक्यात आली आहे. निवडणुकीवेळी मालमत्तेबद्दल त्यांनी चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतःचे एक कोटी रुपये त्यांनी एका शेल कंपनीकडून कर्ज घेतल्याबद्दल दाखविले असल्याने त्याबद्दल आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे अहवाल दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

यामिनी जाधव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पराभव केला आहे. त्यावेळी शपथपत्रात दिलेल्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. यामिनी जाधव यांनी एक कोटी कर्ज घेतल्याचा उल्लेख केला आहे; पण आयकर विभागाने जेव्हा तपास केला, तेव्हा ही एक बनावट (शेल) कंपनी असल्याचे स्पष्ट झाले. ही कंपनी कोलकात्यातील असून, त्यावर काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यातून यामिनी जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नफा मिळविला आहे.

परंतु, यामिनी यांनी प्रतिज्ञापत्रात प्रधान डीलर्स नावाच्या एका कंपनीकडून एक कोटी कर्ज घेतल्याचे नमूद केले. जेव्हा आयकर विभागाने तपास केला, तेव्हा ही प्रधान डीलर्स नावाची शेल कंपनी कोलकात्यामधून उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत होता. विशेष म्हणजे, उदय महावर या व्यक्तीचे नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आले होते. यामिनी जाधव यांनी एक कोटी कर्ज दाखविले आहे, ती रक्कम त्यांचीच आहे, असा आरोप आयकर विभागाने केला आहे.

कंपनी जाधव यांना विकल्याचा जबाबआयकर विभागाने केलेल्या चौकशीत उदय महावर याचा जबाब नोंदविला आहे. त्यामध्ये २०११-१२ मध्ये प्रधान डीलर्स नावाची कंपनी बनविली होती. त्यानंतर ही कंपनी जाधव यांना विकल्याचे नमूद आहे. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. यामिनी यांनी आपल्याकडे ७.५ कोटी रूपये, तर पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :शिवसेनाआमदार