Join us

Yashomati Thakur :कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय, महिला व बालविकास विभागाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:34 PM

State Govt Ordered to Built task force who lost both parents due to corona : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

कोरोनामुळे CoronaVirus दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल  विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. State Govt Ordered to built task force who lost both parents due to corona

सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-19 बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोवीड-19  Covid-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. 

सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोवीड-19 या रोगाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोवीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या निदेर्शानुसार जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.

यामध्ये जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत संबधितांस निर्देश देणे; दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे/निरिक्षण गृहांतील मधील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेतील.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे; अशा बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस आयुक्त/ अधिक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.

"कोविडमुळे अनाथ बालकांची मोठी समस्या संपूर्ण देशातच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ही एक सामाजिक समस्या बनत आहे. मात्र, अशा अनाथ बालकांचे पालन, पोषण, संरक्षण, शिक्षण आदी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही राज्य शासन म्हणून पूर्ण क्षमतेने पार पाडू"-  ॲड. यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकास 

टॅग्स :यशोमती ठाकूरकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस