मुंबई : अभिनेता गोविंदा याच्या कारला बुधवारी रात्री एका गाडीने धडक दिली. मुख्य म्हणजे ही गाडी यशराज फिल्मची असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे जुहू पोलिसांकडून सांगण्यात आले.ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. तेव्हा त्याला धडक देणारी गाडी ही यशराज फिल्मच्या नातेवाइकाची आहे हे त्यांना समजले. त्यानुसार दोघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन काही तक्रार दाखल करायची आहे का? याबाबत विचारणा करण्यात आली.मात्र कोणीही या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नसल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार निव्वळ विम्या संदर्भात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही ते म्हणाले. अपघात घडला तेव्हा कारमध्ये गोविंदा उपस्थित नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.>जुहूच्या प्रतीक्षा बंगल्याजवळून गोविंदाचा मुलगा यशवर्धन कार चालवत निघाला होता. त्याच वेळी त्याच्या मागून आलेल्या गाडीने धडक दिली. रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
यशराजच्या गाडीने दिली गोविंदाच्या कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 1:33 AM