संगीतातील 'देवमाणूस' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:12 AM2018-10-30T07:12:59+5:302018-10-30T07:33:02+5:30

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे.

Yashwant Dev passed away, senior composer and lyricist | संगीतातील 'देवमाणूस' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं निधन

संगीतातील 'देवमाणूस' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं निधन

googlenewsNext

मुंबई- ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले.

मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.

यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा त्यांनी पुढे कायम चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर 1951मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले आहे. गीतातील भावार्थाची लय नेमकी पकडणारे संगीत अनिल विश्वास देतात आणि ते प्रचलित संगीतकारांपेक्षा निराळे आहेत, असे सांगत त्यांनी गुरुनिष्ठा कायम जपली. 

आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. याचबरोबर, संगीतविषयक कार्यशाळा त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. कवितालेखन, रुबाया लिहिल्या आणि कृतज्ञतेच्या सरी त्यांच्या लेखणीतून बरसल्या. तसेच विडंबनगीते केली. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 

Web Title: Yashwant Dev passed away, senior composer and lyricist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.