Join us

यशवंत जाधव, निकटवर्तीयांची स्थावर मालमत्ता १३० कोटींची; कंत्राटदारांनी दडवले २०० कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:57 AM

प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय तसेच सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, त्यांचे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर  मालमत्ता आढळली आहे. तसेच, कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 

प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय तसेच सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. या शोध मोहिमेदरम्यान,  महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधव यांच्यातील संबंध असल्याचे स्पष्ट करत आहे. 

झाडाझडतीतून सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती उघडकीस आली आहे. त्यात त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या सहकारी, बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरीत्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकार क्षेत्रात पाठवल्याचे पुरावेही हाती लागल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले.  कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाइलदेखील सापडल्या आहेत. मात्र त्याच्या नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये नसल्याचेही चौकशीत समोर आले.

जादा रकमेच्या पावत्या आढळल्या

- कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठीची कार्यपद्धती समोर आली आहे. 

- उपकंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करून,  खोट्या खर्चाचा दावा केला आहे. काही व्यवहारांत या कंपन्यांकडून रोख रक्कम काढण्यात आली, व त्याचा वापर कंत्राटे  देण्याबरोबर  मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला गेल्याचे समोर आले. 

- त्यानुसार, अधिक चौकशी सुरू असून, लवकरच अटकसत्र सुरू होणार असल्याचेही प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. या सर्च ऑपरेशन दरम्यान २ कोटींच्या रोकडसह दीड कोटी किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :यशवंत जाधवइन्कम टॅक्स