लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीतून शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ५३ मालमत्ता जप्त झाल्या आहेत. जाधव यांच्यासह त्यांच्याशी संबंधितांनी काही ज्वेलर्सकडून ६ कोटींच्या दागिन्यांची रोखीने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीला जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. शोध मोहिमेदरम्यान, जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधव यांच्यामध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली.
यादरम्यान बेनामी संपत्तीची कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन, प्रिंटर, स्कॅनर, सरकारी दस्तावेज, तसेच पैशांची आणि व्यवहारांची नोंदी केलेली डायरी जप्त करत अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच, एका इमारतीमध्ये ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय असून, याप्रकरणी प्राप्तिकर विभाग अधिक तपास करत आहे.
१० दिवसांत वाढला तपासाचा वेग
कैसर इमारतीतून ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काही ज्वेलर्सकडून ६ कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोखीने पैसे स्वीकारल्याची ज्वेलर्सने कबुली दिली आहे.
एका चेंबर्समध्ये ३ खोल्यांचे टेनन्सी राइटस् खरेदी करण्यासाठी १.१५ कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे. तसेच दक्षिण मुंबईतील अचल संपत्ती हस्तांतरणासाठी ३ कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.