Join us  

यशवंत जाधव प्रकरण: चहल यांच्याकडे मागितली प्राप्तिकर विभागाने माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 7:31 AM

नोटीशीला कार्यालयातील कनिष्ठ पातळीवरून उत्तर

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणात पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवून माहिती मागितली आहे. त्यानुसार,  नोटीस म्हणजे, नियमित प्रक्रियेचा भाग आहे. मी आतापर्यंत एकदाही प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात गेलो नाही. या नोटीसला कार्यालयातील कनिष्ठ पातळीवरून उत्तर दिले जाईल, असे चहल यांनी सांगितले आहे. इक्बालसिंह चहल यांच्या नावे ३ मार्च रोजी ही नोटीस पाठविण्यात आली होती. त्यात १० मार्च रोजी मुंबईतील सिंधिया हाउसमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मुंबई महानगर पालिकेत एप्रिल, २०१८ ते मार्च, २०२२ पर्यंत स्थायी समितीच्या माध्यमातून काही कंत्राटे दिली गेली. जे ठराव पास झाले, त्याची सर्व कागदपत्रे, प्रस्ताव, निविदा, कंत्राटदारांची नावे, त्यांना देण्यात आलेली देयके, काम पूर्ण झाल्यासंबंधी प्रमाणीकरण, बिले, फाइल्स, ऑर्डर शीट, नोट शीट, बैठकांची इतिवृत्ते, लेखापरीक्षणाचे अहवाल, स्थायी समिती सदस्यांचे आधार आणि पॅन कार्ड अशी कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले आहे. याबाबत इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा नोटीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यामार्फत उत्तरे दिली जातात. मी एकदाही प्राप्तिकर विभागाच्या चौकशीसाठी गेलेलो नाही, असे त्यांनी नमूद केले आहेत. यासाठी देण्यात आली नोटीसप्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारी रोजी जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बीमल अगरवाल, तसेच ५ सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. शोध मोहिमेदरम्यान, जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधवमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. या दरम्यान, झालेल्या व्यवहारांसंबंधित माहितीसाठी पालिका आयुक्त म्हणून चहल यांच्या नावाने ही नोटीस बजावण्यात आली होती.