मुंबई - काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली होती. यामध्ये काही व्यवहारांसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमध्ये यशवंत जाधवांची एक महत्त्वाची डायरी सापडली असून, त्यात मातोश्रीला दोन कोटी आणि ५० लाख रुपयांचं घड्याळ दिल्याचा लेखी उल्लेख आढळल्याचे वृत्त आल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. दरम्यान, यशवंत जाधव यांच्याकडील डायरीमध्ये असलेल्या मातोश्रीच्या उल्लेखाबाबत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, मातोश्री म्हणजे आई असू शकत नाही का? आपल्या महाराष्ट्रामध्ये दानधर्माची मोठी परंपरा आहे. मी यशवंत जाधव यांनी दिलेलं स्पष्टीकरण पाहिलं आहे. त्यांनी आईला दानधर्मासाठी काही पैसे दिले, असं म्हटलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी प्राप्तिकर विभागाला सापडलेल्या डायरीच्या सत्यतेवरही शंका घेतली आहे. शिवसेनेमध्ये डायरी लिहिण्याची पद्धत नाही. खोटे पुरावे, गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा डायऱ्या ह्या विश्वासपात्र नसतात, असे सीबीआयने डायरीत भाजपा नेत्यांची नावं आली होती, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाला सापडलेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिले. तसेच दोन कोटी रुपये दानधर्मासाठी दिले, असा उल्लेख होता. त्यावर स्पष्टीकरण देताना यशवंत जाधव यांनी आपण आपल्या आईला ही रक्कम आणि घड्याळ दिल्याचा दावा केला होता.