मुंबई - काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारीमुळे उत्सुकतेची ठरलेली मुंबई महापालिकेतील वैधानिक समिती अध्यक्षपदाची निवडणूक अखेर एकतर्फी ठरली. काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला धक्का दिला. त्यामुळे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या महत्त्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेचे यशवंत जाधव तिसऱ्यांदा निवडून आले. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या जोशी यांची निवड झाली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याने पालिका मुख्यालयात सोमवारी स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस अशी तिहेरी लढत होणार होती. त्यामुळे शिवसेनेला मात देण्यासाठी भाजप कोणती खेळी खेळणार? या विषयी उत्सुकता वाढली होती. मात्र दोन्ही समित्यांच्या निवडणुकांमधून काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे संख्याबळाअभावी भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.
शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला मतदान केले. तर, काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे संध्या दोशी यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाली. शिक्षण समिती शिवसेनेकडे गेल्यामुळे स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. काँग्रेसच्या उमेदवाराने स्थायी समितीमध्ये माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे यशवंत जाधव पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदी निवडून आले. याउलट भाजपच्या दोन नगरसेवकांनी सही करताना शिक्षण समितीमध्ये शिवसेना उमेदवाराचे नाव असलेल्या बाजूने सह्या केल्याचे समजते.