स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव चौथ्यांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:39 AM2021-04-02T06:39:12+5:302021-04-02T06:40:28+5:30
BMC News : मुंबई महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सलग चौथ्यांदा विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना शिवसेनेने संधी दिली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सलग चौथ्यांदा विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना शिवसेनेने संधी दिली आहे. गुरुवारी त्यांनी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज पालिका सचिव यांना सादर केला. यापूर्वी रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांनी चारवेळा अध्यक्षपद भूषविले आहे. तर बेस्ट समिती अध्यक्षपदी वरळीचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांची वर्णी लागली आहे. सुधार आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बदल करण्यात आलेला नाही.
२०१७ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेने भांडुपचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सलग तीन वर्षे यशवंत जाधव अध्यक्षपदी आहेत. पुढच्या वर्षी पालिका निवडणुका असल्याने शिवसेनेने पुन्हा जाधव यांनाच या महत्त्वाच्या पदावर कायम ठेवले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असल्याने त्यांना पुन्हा ही संधी मिळाल्याचे समजते. मात्र, जाधव यांच्या उमेदवारीने अन्य ज्येष्ठ इच्छुक नगरसेवकांच्या स्वप्नावर विरजण पडले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या संध्या दोशी यांना पुन्हा शिक्षण समिती अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासाेबतच आता सुधार समिती अध्यक्षपदी सदा परब यांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे दोशी हे दुसऱ्यांदा तर सदा परब हे तिसऱ्यांदा अध्यक्ष बनणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे आता बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा आशिष चेंबूरकर यांना संधी देण्यात आली आहे. चेंबूरकर यांची पाचव्यांदा बेस्ट समिती अध्यक्षपदी निवड होणार आहे.
विरोधी पक्षाची उमेदवारी
भाजपने स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी राजेश्री शिरवाडकर यांना, सुधार समिती अध्यक्ष पदासाठी स्वप्ना म्हात्रे, शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी पंकज यादव तर बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी प्रकाश गंगाधरे यांना संधी दिली आहे. काँग्रेसतर्फे स्थायीसाठी आसिफ झकेरिया, सुधार - आश्रफ आजमी, शिक्षण - आशा कोपरकर तर बेस्ट समिती - रवी राजा यांना संधी देण्यात आली आहे.