यशवंत जाधव हे भीमपुत्र; ते कारवाईला घाबरणार नाही, यंत्रणेच्या गैरप्रकाराला भिडतील- महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:51 PM2022-02-25T17:51:06+5:302022-02-25T17:53:38+5:30
आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला.
मुंबई- शिवसेनेचे महापालिकेतील नेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय आयकर विभागाने धाड टाकली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरु आहे. मागील ५ वर्षापासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थान परिसरात भेट दिली. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. यंत्रणांकडून होणारा गैरवापर हा मुंबईकर नागरीक पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनचे यशवंत जाधव हे भीमपुत्र असून ते असल्या कारवाईला घाबरणार नसून ते यंत्रणेच्या गैरप्रकाराला भिडतील, असं विधानही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी-
आयकर विभागानं म्हटलं होतं की, २०१९ मध्ये निवडणुकीत शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. त्यासाठी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता ही बाब समोर आली. तपासात कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. ज्यात यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाने पैसे कमवले होते.
काय आहे प्रकरण?
२०११-१२ मध्ये उदय महावर नावाच्या व्यक्तीनं प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यात पैसे जमवले त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. ज्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत.