Join us  

Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आणखी २ नावांचा खुलासा; शिवसेनेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 2:22 PM

आयकर विभागाला मिळालेल्या छापेमारीत एक डायरी आढळली होती. मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचं म्हटलं होते.

मुंबई – महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव(Yashwant Jadhav) यांच्या डायरीमुळे अनेकांचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरी धाड टाकली होती तेव्हा त्यांच्या घरातून एक डायरी सापडली होती. या डायरीतून विविध खुलासा समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख आढळला होता. तेव्हा भाजपाने थेट शिवसेनेवर निशाणा साधला होता.

आता आयकर विभागाच्या तपासातून आणखी एक माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीत आणखी २ नावांचा खुलासा झाला आहे. ज्यांना कोट्यवधीची रक्कम देण्यात आली आहे. डायरीत मातोश्रीनंतर आता केबलमॅन, एम ताई या नावाचा उल्लेख आढळला. त्यातील एक मंत्रिपदाशी संबंधित आहेत तर दुसरं नाव मुंबई महापालिकेतील सक्रीय असणाऱ्याचं आहे असा दावा केला जात आहे अशी बातमी टीव्ही ९नं दिली आहे.  

आयकर विभागाला मिळालेल्या छापेमारीत एक डायरी आढळली होती. मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचं म्हटलं होते. आता त्यात केबलमॅन १ कोटी २५ लाख रुपये तर एम ताईला ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख डायरीत केलेला आहे. त्यामुळे ती दोन नाव कोण? याचा तपास आयकर विभाग करतंय. यशवंत जाधव यांनी ज्यांना पैसे दिलेत त्यांची नावं डायरीत लिहिल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एवढे पैसे यशवंत जाधव यांनी कुणाला दिले? याचा शोध घेतला जात आहे. ही २ नावं समोर येताच आयकर विभागाकडून त्यांनाही समन्स पाठवण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने (एमसीए) सोमवारी मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. हे पत्र ४ एप्रिलला मरिन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपनी मंत्रालयाच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, प्रधान डीलर्ससह सहा कंपन्यांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली आहे.  या तक्रारीत जाधव यांचे नाव नसले तरीही या सगळ्या कंपन्या जाधव यांच्याशी संबंधित असल्याचे एमसीएने म्हटले आहे. जाधव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत.

टॅग्स :यशवंत जाधवइन्कम टॅक्सशिवसेना