Join us

यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:49 PM

Loksabha Election - उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. 

मुंबई - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) मुंबई महापालिकेच्या चाव्या ज्यांच्या हाती होत्या, ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर, सदा सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी लूट केली, ते सगळे भाजपासोबत आहेत. जाधव यांच्यावर आयकर खात्याची धाड पडली, वायकरांवरही तीच चौकशी सुरू होती. हे सगळे मुंबई महापालिकेचे लाभार्थी होते असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार यावरून भाजपा नेत्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या ताब्यात ज्या महापालिका होता, त्यातील नाशिक महापालिका, तिला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्या महापालिकेत लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे त्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही. मुख्यमंत्री स्वत: भ्रष्टाचाऱ्यांसोबत फिरतायेत. नाशिकच्या विकासासाठी मी शहर दत्तक घेतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केली. पण ५ वर्षाच्या सत्ता काळात महापालिकेच्या तिजोरीची लूट झाली असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी फक्त १ प्रकरण समोर आणतोय, २०२०-२२ या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जागेच्या संपादनाची गरज आहे त्यासाठी १७५ कोटी रुपये भूसंपादनाची कारवाई करण्याची परवानगी दिली. त्यावेळी नगरविकास खात्याचे प्रमुख एकनाथ शिंदें यांनी बिल्डर लॉबीला हाताशी धरून ८०० कोटी रुपयांचे भूसंपादन केले. हे ८०० कोटी ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम असतात, त्या नियमांचे पालन केले नाही. ८०० कोटी मर्जीतल्या बिल्डरांना दिले असा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, साधारण ६४ प्रकरणात कोट्यवधीचे व्यवहार झाले, अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला. अनेक जमिनींचे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महापालिकेने बिल्डरांना कोट्यवधी रुपये देऊन जमिनी विकत घेतल्या. ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झाले आहे अशा जमिनींसाठीही २५ कोटी महापालिकेने मोजले. ठक्कर बिल्डर हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. या ठक्करनं अनेक जमिनींशी मालकी त्याच्याकडे नसतानाही कोट्यवधीचा मलिदा लाटला. हेच ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. या ठक्करने ३०० कोटी रुपये लाटले असा आरोप संजय राऊतांनी केला. 

टॅग्स :मुंबईरवींद्र वायकरयशवंत जाधवसंजय राऊतएकनाथ शिंदेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४