‘यशवंत जाधव यांनी राजीनामा द्यावा’; भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदेंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 02:09 AM2020-12-02T02:09:08+5:302020-12-02T02:09:27+5:30
वरील सर्व प्रकार हा मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला काळीमा फासणारा आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या ई विभाग प्रभाग क्र. २०९चे स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या प्रभागात लघुत्तम निविदाकार मे. यश कॉर्पोरेशन यांच्या कंपनीला ई निविदेअंतर्गत १४ कामे मिळालेली असता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवरुन कॉल करुन ‘सदर काम तू मागे घे’ अशा प्रकारची धमकी दिली. सदर कंत्राटदाराने याची लेखी तक्रार मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त यांना केलेली आहे. सदर तक्रारीत माझ्या जीवितास काही इजा किंवा धोका उत्पन्न झाला तर त्यास सर्वस्वी स्थायी समिती अध्यक्ष हे जबाबदार राहतील अशा प्रकारचा उल्लेख असलेली तक्रार सर्व संबंधितांना स्वत:च्या स्वाक्षरीत दिलेली आहे.
वरील सर्व प्रकार हा मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला काळीमा फासणारा आहे. आणि म्हणूनच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याची नैतिक जबाबदारी स्विकारून स्थायी समिती अध्यक्ष पदाचा तातडीने राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
लघुत्तम निविदाकारावर दबाव आणून त्याला कार्यादेश व चलन न देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे हा प्रकार कामकाज सत्ताधारी कशा प्रकारे मनमर्जी कारभार चालवत आहेत व भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत याचे उत्तम उदाहरण आहे. या संदर्भातील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या व कंत्राटदारासोबतच्या संभाषणाची ध्वनिफीत उपलब्ध आहे. तसेच कंत्राटदाराची चित्रध्वनिफीतही उपलब्ध असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.