लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - नूतनीकरणासाठी फेब्रुवारीपासून बंद असलेल्या माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाचा दरवाजा पुन्हा एकदा नाटककार गो. ब. देवल स्मृतीदिनाचे औचित्य साधत उघडण्यात आला आहे. सर्वसामान्य रसिकांसाठी मात्र हे नाट्यगृह २२ जूनपासून खुले होणार असून, नूतनीकरणानंतर दिलीप प्रभावळकर व विजय केंकरे यांच्या 'पत्रा पत्री'चा पहिला प्रयोग सादर केला जाणार आहे.
बदाम राजा प्रॉडक्शन्स निर्मित अभिवाचन-दृक आविष्कार असलेल्या 'पत्रा पत्री'मध्ये पत्रवाचन केले जाते. याचे लेखन दिलीप प्रभावळकरांनी केले असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. नितीन नाईक आणि दीपक जोशी या प्रयोगाचे सूत्रधार आहेत. २३ जूनला निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डेच्या 'आज्जीबाई जोरात'चा प्रयोग होईल. त्यानंतर आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे यांचे 'नकळत सारे घडले', प्रशांत दामले-विनय येडेकर या जोडीचे 'गेला माधव कुणी कडे', डॉ. गिरीश ओक व पूर्णिमा तळवलकरांचे 'स्थळ आले धावून', 'कोण म्हणतो टक्का दिला' असे एका पेक्षा एक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सादर केले जातील.
दामोदर हॅाल पुनर्विकासासाठी पाडण्यात आला असून, रवींद्र नाट्य मंदिर ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद आहे. शिवाजी नाट्य मंदिरमध्ये काही निर्माते आपल्या नाटकांचे प्रयोग करत नाहीत. यशवंत नाट्यगृहही नूतनीकरणासाठी बंद असल्याने लालबाग-परळपासून माटुंगा-माहिमपर्यंतच्या रसिकांना आवडते नाटक पाहण्यासाठी विले पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृह गाठावे लागत होते. यशवंत सुरू झाल्याने नाट्यप्रेमींना थोडा दिलासा मिळाला आहे.
यशवंत नाट्य संकुलाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, नव्या स्वरूपात नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू करताना प्रायोगिक रंगभूमीसाठी तालीम हॅाल तयार करता आल्याचा आनंद नाट्यगृह व्यवस्थापनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नाट्यगृह यशवंत नाटयगृहासारखे अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तयार असल्याचे गो. ब. देवल स्मृतीदिन सोहळ्यात प्रशांत दामले म्हणाले होते. त्यानुसार सरकारने पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे अशीच सुसज्ज करण्याचा मानस दामले यांनी व्यक्त केला आहे.