मुंबई - प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असून, परळमधील दामोदर हॉल पुनर्विकासासाठी तोडण्यात आला आहे. आता माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरही नूतनीकरणाच्या कामासाठी पुन्हा बंद करण्यात येणार आहे. या काळात दादर-माटुंग्यातील रसिकांसाठी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहच आधार देणार आहे.
१३ मार्च २०२० रोजी बंद झालेला माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिराचा पडदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी सत्तेत आल्यानंतर ३ वर्षे २२ दिवसांनी उघडला. नाट्यगृहातील अत्यावश्यक कामे प्रचंड वेगात पूर्ण करून तसेच जलद गतीने सर्व परवानग्या मिळवून १४ जून २०२३ रोजी नाट्य परिषदेने गो. ब. देवल स्मृतीदिन मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यानंतर उर्वरीत कामे पूर्ण केल्यावर ५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वसामान्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करण्यात आले. अद्यापही नाट्यगृहातील कामे बाकी असल्याने यशवंत नाट्य मंदिर काही काळासाठी पुन्हा रसिकांसाठी बंद राहणार आहे. यशवंतमधील काही कामे शिल्लक असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असल्याचे परिषदेच्या वतीने ऑगस्ट महिन्यातच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात उर्वरीत कामे सुरू करण्यात येणार आहेत. याच कारणामुळे २०२४मधील पहिल्या तिमाहीतील तारखांचे वाटप करताना १ फेब्रुवारीनंतरच्या तारखांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीनंतर 'यशवंत'चा पडदा बंद राहणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याच्या कामासोबतच इतरही लहान-सहान कामे उरकून लवकरात लवकर नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू करण्याची योजना आहे. यासाठी नाट्य निर्माते पूर्ण सहकार्य करणार असले तरी नाटकांच्या प्रयोगांची संख्या निश्चितच कमी होणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले सध्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाच्या कामात व्यग्र आहेत. लवकरच यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाच्या काळात श्री शिवाजी नाट्य मंदिर हे एकमेव नाट्यगृह रसिकांच्या मनोरंजनाचे काम करणार आहे. सध्या भायखळ्यातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह रसिकांचे लक्ष वेधत असले तरी दादर-माटुंग्यातील रसिकांसाठी ते दूर आहे. असे असूनही मागील काही दिवसांपासून अण्णाभाऊ साठे नाट्यागृहाला चांगले बुकिंग मिळत आहे.