ब्रेकवर जाणार यशवंत नाट्य मंदिर; प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणाऱ्या 'बी पॉझिटिव्ह'ने पडणार नाट्यगृहाचा पडदा

By संजय घावरे | Published: January 29, 2024 09:57 PM2024-01-29T21:57:34+5:302024-01-29T21:57:46+5:30

प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरामागोमाग आता नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरही ब्रेकवर जाणार आहे.

Yashwant Natya Mandir to go on break; | ब्रेकवर जाणार यशवंत नाट्य मंदिर; प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणाऱ्या 'बी पॉझिटिव्ह'ने पडणार नाट्यगृहाचा पडदा

ब्रेकवर जाणार यशवंत नाट्य मंदिर; प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणाऱ्या 'बी पॉझिटिव्ह'ने पडणार नाट्यगृहाचा पडदा

मुंबई - प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरामागोमाग आता नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरही ब्रेकवर जाणार आहे. ब्रेक घेण्यापूर्वी उद्या (३० जानेवारी) यशवंतमध्ये 'बी पॉझिटिव्ह' या प्रायोगिक लोकनाट्याचा शेवटचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे.

१ फेब्रुवारी २०२४ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्यमंदिरातील उर्वरीत नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची बातमी 'लोकमत'मध्ये यापूर्वीच प्रकाशित झाली आहे. त्यानुसार नूतनीकरणापूर्वी ३० जानेवारीला यशवंतमध्ये अखेरचा प्रयोग रंगणार आहे. दुपारी ४ वाजता 'जन्मवारी' हे नाटक होईल, तर रात्री ८ वाजता 'बी पॉझिटिव्ह' या संदेश गायकवाड लिखित-दिग्दर्शित प्रायोगिक नाटकाचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाईल. आकृती थिएटर निर्मित आणि सम्यक कलांश प्रतिष्ठान प्रकाशित या नाटकात संध्या पानस्कर, चंदर पाटील, अनुप जाधव, अर्जुन शेळके, सोनम पवार, उमेश कांबळे, संदेश गायकवाड हे कलाकार आहेत. यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामात प्रामुख्याने वातानुकूलित यंत्रणा पूर्णत: बदलण्यात येणार आहे. याखेरीज आसनव्यवस्था, साऊंड, स्वच्छतागृहे तसेच इतर उरलेली बारीक-सारीक कामे करण्यात येणार आहेत.

सध्या नाटकाच्या तालिमीच्या हॉलचे नूतनीकरण सुरू आहे. मुख्य नाट्यगृहातील नाटकांचे प्रयोग थांबल्यावर सर्वप्रथम खुर्च्या काढून आसनव्यवस्थेच्या कामावर लक्ष केंद्रित येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

१३ मार्च २०२० रोजी बंद झालेला यशवंतचा पडदा नाट्य परिषदेच्या नवीन कार्यकारिणीने ३ वर्षे २२ दिवसांनी उघडला. नाट्यगृह सुरू करण्यासाठी अत्यावश्यक कामे वेगात पूर्ण करून तितक्याच वेगात परवानग्याही मिळवल्या आणि १४ जून २०२३ रोजी गो. ब. देवल स्मृतीदिन यशवंतमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर अत्यावश्यक कामे पूर्ण करून ५ ऑगस्टला नाट्यगृह सर्वसामान्य रसिकांसाठी खुले करण्यात आले. आता उर्वरीत कामांसाठी यशवंत नाट्य मंदिर पुन्हा बंद होणार आहे. यासाठी अगोदरच यंदाच्या पहिल्या तिमाहीतील दोन महिन्यांच्या तारखांचे वाटप करण्यात आले नव्हते. नूतनीकरणानंतर हे नाट्यगृह पुन्हा कधी सुरू होणार याबाबत सध्या तरी काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Web Title: Yashwant Natya Mandir to go on break;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.