Join us

यशवंत नाट्यमंदिराला पंचतारांकित हॉटेलचा साज; चकचकीत झगमगीत रूप पाहून डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 6:42 AM

तालमीची जागाही इतकी छान केली आहे की, नावं ठेवायलाच जागा नाही.

तुषार श्रोत्री नाट्यरसिक

प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा तिसरी घंटा झाली, पडदा हळूहळू बाजूला झाला आणि ऑर्गनच्या सुरावटीवर माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात पुन्हा नव्याने नांदी सुरू झाली.  माहीम, माटुंगा आणि दादर या मराठी बहुल भागांतील नाट्य-संगीत रसिक प्रेक्षकांची प्रतीक्षा एकदाची संपली. वर्तमानपत्रांतील मनोरंजनाच्या पानांवरील जाहिरातीत पुढील प्रयोग यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा असं पुन्हा एकदा झळकू लागलं. नाट्य परिषदेच्या या सुप्रसिद्ध वास्तूत प्रेक्षकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली.

तसं पाहिलं, तर नाट्यरसिकांची पंढरी असलेल्या शिवाजी मंदिरापासून यशवंत नाट्यमंदिर केवळ हाकेच्या अंतरावर आहे, पण सोईसुविधांच्या दृष्टिकोनातून त्या विभागातल्या प्रेक्षकांची यशवंत नाट्यमंदिराला अग्रक्रमाने पसंती मिळते. कारण इथे असलेली पुरेशी वाहन पार्किंगची सोय आणि अद्ययावत सभागृह. मराठी नाट्य परिषदेचं स्वतःचं हक्काचं हे नाट्यगृह असल्याने हे एके काळी मराठी कलाकारांचं माहेरघर होतं आणि त्याचमुळे भेटण्याचं परवलीचं ठिकाणही. नाट्य परिषदेच्या कार्यालयात नियमित येण्या-जाण्याच्या निमित्ताने अनेक कलाकार यशवंत नाट्यमंदिराच्या आवारात एकमेकांना भेटायचे. हे योग आता पुन्हा जुळून येतील.

पंचतारांकित सजावट या संकुलात पूर्वी विविध नाटकं आणि कार्यक्रमांना हजेरी लावलेल्या मराठी प्रेक्षकांना आता तिथे आमूलाग्र बदल झालेला जाणवतो. एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे इथली सर्व सजावट आहे. मोठमोठी झुंबरं लावली आहेत. तालमीची जागाही इतकी छान केली आहे की, नावं ठेवायलाच जागा नाही. ७०-८० बैठक व्यवस्थेच्या क्षमतेचा एक छोटा, पण वातानुकूलित हॉल किंवा सभागृह विविध बैठकांसाठी आणि छोट्या कार्यक्रमांसाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध केला आहे.

ज्येष्ठ, अपंगांसाठी विशेष सीट लिफ्ट मुख्य सभागृहाचाही संपूर्ण चेहरामोहरा बदलला आहे. वातानुकूलित यंत्रणा पूर्ण नवी लावली असून प्रकाश योजनेची संसाधनंही सर्व नव्याने बसविली आहेत. प्रेक्षकांना नक्कीच इथे एक नवा सुखद असा अनुभव येईल यात शंकाच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिक किंवा अपंगांसाठी एक विशेष सीट लिफ्ट बसविलेली आहे. अशी लिफ्ट महाराष्ट्रात इतर कुठल्याही  सभागृहात अजून तरी बसविलेली आढळली नाही. नाट्यमंदिराच्या सुशोभीकरणासाठी थोडा वेळ लागला असला, तरी मायबाप प्रेक्षकांच्या सर्व सुखसोयींचा आणि गरजांचा विचार करून, त्यानुसार आवश्यक ते बदल केलेले या नव्या नाट्यमंदिरात आढळतात. एकंदरीत काय, तर कुठल्याही मराठी नाट्यरसिकाला अभिमान वाटावा, असं यशवंत नाट्यमंदिराचं चकचकीत झगमगीत स्वरूप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. उपनगरातील मराठी नाट्यरसिकांचाही ओढा आता या नाट्यमंदिराकडे वाढेल, यात शंकाच नाही. मराठी नाट्य परिषदेचे अभिनंदन आणि शुभेच्छा!