तीन वर्षे चार महिन्यांनी उघडणार 'यशवंत'चा पडदा; नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:23 PM2023-08-05T14:23:26+5:302023-08-05T14:24:01+5:30
कोरोनापासून बंद असलेल्या माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराचा पडदा ३ वर्षे २२ दिवसांनी पुन्हा उघडणार आहे.
मुंबई :
कोरोनापासून बंद असलेल्या माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराचा पडदा ३ वर्षे २२ दिवसांनी पुन्हा उघडणार आहे. नूतनीकरणावर सव्वातीन कोटी रुपये खर्च केल्यानंतर सर्वप्रथम 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे.
१३ मार्च २०२० रोजी अमोल पालेकर यांच्या 'कुसूर' या हिंदी नाटकाचा यशवंतमधील प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे बंद करण्याचा सरकारी आदेश आला आणि यशवंतला टाळे लागले. कोरोना जाऊन दीड दोन वर्षे - लोटली तरी यशवंत नाट्य मंदिराचा पडदा उघडला नव्हता. अग्निशमन दलाची पवानगी नसल्याने आणि कोरोनाच्या काळात झालेल्या दुरवस्थेमुळे यशवंत नाट्य मंदिर बंदच ठेवण्यात आले होते. एप्रिलमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.
त्यानंतर १६ मे रोजी प्रशांत दामले अध्यक्ष बनले आणि यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाची चक्रे वेगाने फिरू लागली. १४ जूनला यशवंतमध्ये गो. ब. देवल स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जुलैमध्ये नाट्यगृह रसिकांसाठी खुले होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, पण, नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने नाट्यगृह बंदच होते.
अखेर नूतनीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात पोहोचल्याने यशवंत नाट्य मंदिर रसिकांसाठी खुले झाले आहे. उद्या अशोक सराफ आणि निर्मिती सावंत अभिनीत 'व्हॅक्युम क्लिनर' या नाटकाचा, तर ६ ऑगस्टला प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची भूमिका असलेल्या एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
फायर एनओसी मिळविली
■ यशवंत नाट्य मंदिराच्या
नूतनीकरणाबाबत 'लोकमत'शी बोलताना नाट्य परिषदेचे कार्यवाह अजित भुरे म्हणाले की, सर्वप्रथम नाट्यगृहासाठी महत्त्वाची असलेली नवीन अग्निरोधक यंत्रणा बसवून फायर एनओसी मिळविली.
■ बऱ्याच ठिकाणची पाणीगळती बंद केली. वातानुकूलित यंत्रणाही दुरुस्त केली. ध्वनियंत्रणा आणि रंगमंचाशी निगडीत कामांसोबत रंगरंगोटीही करण्यात आली.
■ आसने व पडद्याची साफसफाई केली असून, व्हीआयपी रूम आणि मेकअपरुमसह स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नाट्य परिषदेवर निवडून आल्यानंतर दोन महिन्यांमध्ये सर्व कामे केल्याचेही भुरे म्हणाले.
. नूतनीकरणाची कामे अद्याप सुरू असून, यासाठी सव्वा तीन कोटी रुपये खर्च येणार आल्याचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी सांगितले.