लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे राज्याला आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे, देशाला नवी दिशा देणारे द्रष्टे नेते होते, अशा शब्दांत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील अलौकिक, अतुलनीय कार्याबद्दल डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते.
परकीय संकटात देश अस्वस्थ स्थितीतून जात असताना या देशाच्या लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, अशी भूमिका त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी घेतली आणि चव्हाण साहेबांकडे संरक्षण खात्याची जबाबदारी दिली. त्यानंतर यशवंतरावांनी देशात प्रचंड परिवर्तन केले. चीनच्या आक्रणानंतर देशाची जी स्थिती झाली होती, ती पूर्ण बदलण्यासाठी संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केल्याचे पवार म्हणाले.
लहान मुलांसाठी सकस अन्नसुरक्षा हवी
यशवंतराव चव्हाण हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. माझे वडीलही एका ध्येयाने पछाडलेल्या काळाच्या पिढीतील होते. देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले होते. आपल्या देशात अन्नसुरक्षा आहे, पण लहान मुलांसाठी सकस अन्नसुरक्षा असायला हवी; कारण १९७२ साली आपण एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रम सुरू केला; पण ५० वर्षांनंतरही देशात कुपोषणाची समस्या कायम आहे. - डॉ. सौम्या स्वामीनाथन.