"यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:09 PM2024-03-11T13:09:49+5:302024-03-11T13:16:14+5:30
यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिले आहे.
मुंबई - महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना दिले आहे.
नेतृत्व... कर्तृत्व... आणि वक्तृत्व व उत्तम प्रशासक... सुसंस्कृत राजकारणी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा मानसन्मान... अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा मंगलकलश आला तो केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने. देशाचे गृहमंत्री, उपपंतप्रधान म्हणून त्यांची कारकिर्द दैदीप्यमान आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री अशी उपाधी त्यांना लाभली आहे. अशा व्यक्तीमत्वाचा यथोचित सन्मान हा केवळ भारतरत्न म्हणून होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारकडे एकमताने शिफारस करावी अशी मागणी सुरज चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.
आज निवेदन देताना सुरज चव्हाण यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.