Join us

'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 9:45 PM

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच अमेय खोपकर यांच्या यापूर्वीही अनेकदा शाब्दीक चकमक झाली आहे

मुंबई - राज्यात सध्या हर हर महादेव चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. संभाजीराजे भोसले यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन या चित्रपटाचा शो रद्द केला. त्यानंतर, मनसेनं पुन्हा चित्रपटगृहात जाऊन तो शो सुरू करायला भाग पाडले. या वादावरुन मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. त्यातच, मनसेचे अमेय खोपकर आणि आमदार अमोल मिटकरींनी फोनो वर बोलत असताना एकमेकांना अरेरावी केली. तसेच, दमही भरल्याचं ऐकायला मिळालं, 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच अमेय खोपकर यांच्या यापूर्वीही अनेकदा शाब्दीक चकमक झाली आहे. मात्र, आता हर हर महादेव चित्रपटाला राष्ट्रवादीने केलेल्या विरोधानंतर साम टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी आणि अमेय खोपकर यांच्यातील संयम सुटल्याचे दिसून आले. दोघेही नेते एकमेकांवर अर्वाच्य भाषेत तुटून पडले. चौकातल्या पोरांप्रमाणे ही नेतेमंडळी टेलिव्हीजनवर भांडत होती. 

या मिटकरीला काय अक्कल आहे, हा बेअक्कल माणूस आहे, असे अमेय खोपकर यांनी म्हटले. त्यावर, मिटकरी यांनीही अरेरावी करत तू बेअक्कल आहेस, तुझा आणि इतिहासाचा काय संबंध, तुला काय इतिहास माहितीय, असे म्हणत आम्ही शिवप्रेमी संघटना चित्रपट बंद पाडणारच असे म्हणत भूमिका मांडली. त्यावर, तू ये उद्या मी ठाण्यात शो लावतोय, हिंमत असेल तर बंद करुन दाखव, असे म्हणत अमेय खोपकर यांनी मिटकरींना दमच भरला. आव्हाडांच्या नाकावर टिच्चून आम्ही उद्या शो लावतोय, तू येऊन दाखव, असं आव्हानही खोपकरांनी मिटकरींना दिलं. 

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही अमोल मिटकरींना सुनावले. शिवाजी महाराजांचा इतिहास काय खरा आणि काय खोटा हे सांगणारे तुम्ही कोण, प्रेक्षकांनी कोणता चित्रपट पाहण्यासाठी जायचं याचं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण, असा सवाल विचारला.  

टॅग्स :अमोल मिटकरीमनसेसिनेमाठाणेजितेंद्र आव्हाड