‘येस... मला घर लागले!’

By admin | Published: May 10, 2016 02:19 AM2016-05-10T02:19:39+5:302016-05-10T02:19:39+5:30

तब्बल वीस ते तीस वर्षे गिरण्यांमध्ये काम करूनही हाती निराशाच लागलेल्या शेकडो गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न आज पूर्ण झाले

'Yeah ... I got home!' | ‘येस... मला घर लागले!’

‘येस... मला घर लागले!’

Next

मुंबई : तब्बल वीस ते तीस वर्षे गिरण्यांमध्ये काम करूनही हाती निराशाच लागलेल्या शेकडो गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न आज पूर्ण झाले. सोमवारी निघालेल्या लॉटरीदरम्यान गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या तोंडून निघणारे ‘येस.... मला घर लागले!’ हे वाक्य त्यांच्या मुंबईतील घरांची स्वप्नांची कहाणी सांगून जात होते. मुंबईतील सहा गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या २ हजार ६३४ घरांच्या सोडतीसाठी तब्बल १८ हजार ७०३ अर्जांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे शेकडो गिरणी कामगार सकाळपासूनच सोडतीसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर जमा झाले होते. सोडत सुरू होण्याआधीच रंगशारदा सभागृह भरले होते.
> खडतर परिस्थितीतही धीर सोडला नाही
प्रकाश कॉटन मिलच्या जागेवरील घरांसाठी काढलेल्या सोडतीमध्ये यल्लुबाई कोकितकर यांना घर लागले. यल्लुबाई यांचे पती तुकाराम कोकितकर या मिलमध्ये कामाला होते. मात्र, आजारपणामुळे १९९७ सालीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १९९८ साली मालाड परिसरातील मालकीचे घर अनधिकृत बांधकामात गमवावे लागले. त्यानंतर, यल्लुबाई गावी जाऊन शेतीवर उदरनिर्वाह करू लागल्या, तर त्यांची दोन्ही मुले प्रकाश आणि मारुती यांनी पदपथावर राहून दिवस काढले. त्यानंतर दिवंगत दत्ता सामंत यांच्या युनियनमधील काही नेत्यांच्या ते संपर्कात आले. या नेत्यांनी युनियनच्या कार्यालायतच त्यांची राहण्याची सोय केली. कार्यालयातील कामे करतानाच सुरक्षा रक्षकाची नोकरी दोघा भावांनी स्वीकारली. एक दिवस मुंबईत आपलेही घर होईल, असा विश्वास त्यांना होता. बाबा काम करत असलेल्या ठिकाणीच आज सोडतीत घर लागल्यामुळे एक स्वप्न पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया मारुतीने व्यक्त केली. घराचा ताबा मिळाल्यानंतर प्रथम आईला गावावरून या ठिकाणी पुन्हा आणणार असल्याची इच्छाही त्याने व्यक्त करून दाखवली.
> तीन प्रयत्नांनंतर यश
‘म्हाडाच्या स्वस्त घरांच्या लॉटरीमध्ये तीन वेळा अर्ज केला होता. मात्र, अखेर चौथ्यांदा गिरणी कामगारांच्या लॉटरीमध्येच घर लागले. त्यामुळे २२ वर्षे सेंच्युरी मिलमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मिळाल्याचा आनंद आहे. इतकी वर्षे प्रभादेवीमधील गणेशनगर येथील भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो. मात्र, सोडतीत लागलेल्या या घराचा ताबा घेतल्यानंतर दोन्ही मुलांसह स्वमालकीच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईली,’ अशी प्रतिक्रिया दीपक लोगडे यांनी व्यक्त केली.

Web Title: 'Yeah ... I got home!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.