२०२१ हे वर्ष ग्रहणमुक्त - सोमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:50+5:302020-12-29T04:06:50+5:30
एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे : भारतातून एकही दिसणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नवीन वर्षात एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे होणार ...
एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे : भारतातून एकही दिसणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवीन वर्षात एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे होणार आहेत. मात्र, भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही. २६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅण्ड, अरुणाचल येथून दिसणार आहे. १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. पण, ही तिन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे २०२१ हे वर्ष ग्रहणमुक्त आहे, असे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
२०२१ मध्ये २७ एप्रिल आणि २६ मे रोजी सुपरमून दिसेल. १७ एप्रिल रोजी चंद्र-मंगळ पिधान युती दिसेल. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही. मात्र, सायंकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसेल. चंद्रबिंब एखादा ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते, त्याला पिधान युती म्हणतात.
दरम्यान, २०२१ हे वर्ष लीपवर्ष नाही. सरत्या २०२० या वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नाही. त्यामुळे नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होईल. मात्र, पृथ्वीच्या गतीत होणाऱ्या बदलामुळे २०२१ मध्ये ३० जूनला रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता आहे.
* उल्कावर्षाव हाेणार
४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ॲागस्ट, २२ ॲाक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी उल्कावर्षाव होईल. २०२१ मध्ये १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीत.
.....................