Join us

नवा आनंद घेऊन आले २०२१ साल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:05 AM

‘कोरोनाचे संकट घेऊन आले २०२० साल,नैराश्याच्या ढगांनी झाले सर्वांचे हाल,घटणारा प्रभाव व प्रभावी लस घेऊन आली नवी ...

‘कोरोनाचे संकट घेऊन आले २०२० साल,

नैराश्याच्या ढगांनी झाले सर्वांचे हाल,

घटणारा प्रभाव व प्रभावी लस घेऊन आली नवी आशा,

२०२१ साल जाईल आनंदात विचारांना देऊन नवी दिशा!’

२०२० साल काेरोनाच्या ह्या महाभयंकर विषाणूच्या साथीमुळे पूर्ण व्यापले गेले. सर्वांच्या आयुष्यात फार मोठा बदल घडून आला. अनेकांनी आपले मित्र, नातेवाईक गमावले. अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्थितीही बिकट झाली. लाॅकडाऊन, माणसाच्या प्रत्यक्ष भेटीगाठी नाहीत, सातत्याने घरात राहणे, जीवनावश्यक आणि इतर वस्तूंचा तुटवडा, सतत भीतीचे वातावरण, आरोग्य सेवांमधील समस्या, मर्यादित उपचार सुविधा या आणि अशा अनेक गोष्टींमुळे पूर्ण जगच नैराश्याच्या गर्तेत गेले. त्यानंतर संशोधकांच्या अथक प्रयत्नांनी कोविड विषाणूवर प्रभावी आणि सुरक्षित लस शोधण्याचे काम सुरू झाले आणि ते यशस्वी टप्प्यातही आले. त्याचबरोबर ज्या देशांनी सर्वतोपरी योग्य काळजी घेतली तेथे रुग्णसंख्याही कमी होऊ लागली. बऱ्याच ठिकाणी आर्थिक उलाढालींची गाडीही हळूहळू रुळावर येऊ लागली. सकारात्मक बातम्यांमुळे आणि योग्य शास्त्रीय माहिती उपलब्ध झाल्यामुळे लोकांना स्वत:ची काळजी कशी घ्यायची ते समजले व त्यांच्या मनातील भय हळूहळू कमी होऊ लागले.

मध्येच इंग्लंड आणि काही देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे, अशा बातम्यांमुळे परत थोडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु त्यावर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना व योग्य शास्त्रीय माहिती आवश्यक आहे. जी घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर नक्की त्या भयाच्या सावटातून आपण बाहेर येऊ.

‘पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा,

सकारात्मक विचारांनी आयुष्याला देऊ नवी दिशा’

चला तर आपण सकारात्मक विचारांनी नकारात्मकतेचे ढग पळवून लावू या.

या संपूर्ण काळामध्ये मित्र-मैत्रिणी, रुग्ण, नातेवाईक यांनी ताणतणावातून बाहेर येण्यासाठी सल्ला मागितला. त्यांना जे मार्गदर्शन मी केले आणि अजूनही करत आहे ते तुम्हा सर्वांनाही मी सांगू इच्छिते.

सर्वांत प्रथम कोरोनाची साथ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे हे स्वीकारणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली तर आपले नुकसान होते, परंतु तर्कशुद्ध विचार आणि उपाययोजनांनीच आपण त्यातून मार्ग काढू शकतो.

तर या परिस्थितीतून आपण सकारात्मक व तणावमुक्त कसे व्हायचे ते पाहू या.

- ताणाचे अनावश्यक ओझे झुगारून द्या व मनाची प्रतिकारशक्ती वाढवा.

- आपल्या जीवनशैलीत जे बदल झाले आहेत ते स्वीकारून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे मास्क घालणे, सतत हात धुणे यांसारख्या ज्या अतिरिक्त परंतु अत्यावश्यक गोष्टी आपल्याला कराव्या लागत आहेत त्याला विरोध न करता जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारा.

- अशास्त्रीय माहिती, भीती निर्माण करणाऱ्या बातम्या यापासून दूर राहा.

- आपले किती व कसे नुकसान झाले? आपले आयुष्य उगीचच कसे बदलले, याचा सातत्याने विचार करू नका. न्यूनगंड बाळगू नका, इतरांशी स्वत:ची तुलना करू नका. संकटापेक्षा आपण त्यावर कशी मात करू व आपली बलस्थाने काय आहेत, आपले सामर्थ्य कसे आहे यावर लक्ष केंद्रित करा.

- सकारात्मक बातम्याच इतरांना सांगा व तसाच विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात वेळ घालवा. आपल्या पंचेंद्रियांना चांगल्या गोष्टीच जाणीवतील असे पाहा.

- लाॅकडाऊनमध्ये शिकलेल्या नवीन व चांगल्या गोष्टी नंतरही सुरू ठेवा. छोट्या व्यवसायांना पाठिंबा द्या. आपल्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये आत्मसात करा. ज्यायोगे तुमची प्रगती होईल. हातात असलेले काम पूर्ण करा. अर्धवट राहिलेल्या कामामुळे ताण वाढतो.

- बदललेल्या परिस्थितीही तुमचे ध्येय निश्चित करा व वेळेचे नियोजन करा.

- दुसऱ्यांना मदत करा, चांगले विचार लिहून काढा. आपण काय गमावले त्यापेक्षा काय कमावले याची उजळणी करा.

- श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन इत्यादी तणावमुक्तीचे मार्ग जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारा.

- वैचारिक बैठक व तर्कशुद्ध विचार हा आपला पाया आहे, तो पक्का करा.

- पुरेशी झोप, संतुलित आहार, योग्य पद्धतीने केलेला शारीरिक व मानसिक व्यायाम हे सर्वांत शेवटी आवश्यक आहेच!

आपण दरवर्षी म्हणतो त्याप्रमाणे या वर्षीही म्हणू या...

‘सरले ते वर्ष, गेला तो काळ,

नवी सुरुवात, नवा आनंद घेऊन आले २०२१ साल’

- डॉ. प्रज्ञा दिवाण,

(लेखिका मनोविकार तज्ज्ञ आहेत.)