स्वत:च्याच मृत्यूबद्दल वर्षभरानंतर गुन्हा
By admin | Published: November 17, 2016 06:51 AM2016-11-17T06:51:34+5:302016-11-17T06:51:34+5:30
स्पीडब्रेकरवर आदळून मृत्युमुखी पडलेल्या बाईकस्वारावरच वर्षभरानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हयगय करत गाडी चालवून स्वत:च्या मृत्युला
कल्याण : स्पीडब्रेकरवर आदळून मृत्युमुखी पडलेल्या बाईकस्वारावरच वर्षभरानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हयगय करत गाडी चालवून स्वत:च्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा हा गुन्हा आहे. गतीरोधकाची रचना सदोष होती का, याबाबत पालिकेची चौकशी न करता मरण पावलेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने नातलगांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी मात्र कायदेशीर तरतूद पाळल्याचा दावा केला आहे.
सदोष स्पीडब्रेकरबाबत पोलिसांनी पालिकेची चौकशी न करता मृत व्यक्तीवर मंगळवारी गुन्हा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
बिर्ला कॉलेज परिसरात राहणारे विश्वजित मंडल (३७) आपल्या अॅक्टिव्हा गाडीवरून गेल्यावर्षी ५ आॅक्टोबरला रात्री ११.३० च्या सुमारास आरटीओ कार्यालय परिसरातून घरी जात होते. तेव्हा बिर्ला कॉलेजसमोरील रस्त्यावर असणाऱ्या स्पीडब्रेकरवर त्यांची मोटारसायकल उडाली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरु वातीला कल्याणच्या खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची चिंताजनक झालेली प्रकृती पाहून त्यांना मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी उपचार सुरु असताना ६ आॅक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युने आधीच दु:खात बुडालेल्या, कसेबसे सावरत असलेल्या त्यांच्या परिवारावर वर्षभराने पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून नव्याने आघात झाला आहे.
याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. के. खिल्लारे यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले, या प्रकरणाचा अहवाल आता मिळाला आहे. तो मिळाल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)