यंदा हज यात्रेसाठीची सर्व प्रक्रिया डिजिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 03:07 AM2020-02-18T03:07:49+5:302020-02-18T03:08:12+5:30
मुख्तार नक्वी : भारत बनला जगातील पहिला देश, राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप
मुंबई : केंद्रीय हज कमिटीच्यावतीने या वर्षी हज यात्रेसाठीची सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात आलेली असून दोन लाखांवर यात्रेकरू त्यामध्ये सहभागी होणार आहेत. सर्व प्रक्रियांसाठी संगणक व इंटरनेटचा वापर करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री मुख्तार नक्वी यांनी सोमवारी केला.
सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथील हजचा मुख्य विधी यंदा आॅगस्टमध्ये होत आहे. त्यासाठी भारतातून हज कमिटी व खासगी टूर्स कंपन्यांकडून २ लाख भक्तांना पाठविले जाणार असून, त्यांच्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये देशभरातून ५५० वर प्रशिक्षक सहभागी होते. या शिबिराचा समारोप आणि कमिटीच्या आयएएस प्रशिक्षण सेंटरचे उद्घाटन नक्वी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले,‘यंदा ‘इज आॅफ डूइंग हज’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. सर्व कारभार आॅनलाइन पद्धतीने होत आहे. त्यासाठी अर्ज मागविणे, सोडत, ई-विजा, हज पोर्टल, हज मोबाइल अॅप, ई-मसिहा आरोग्य सुविधा, मक्का व मदिना येथील मुक्कामासाठीची ई-लगेज टैगिंग आदी सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली आहे. त्यामुळे पूर्णपणे पारदर्शी व्यवहार झाला आहे. या वर्षी मोठ्या संख्येने पुरुषाविना महिला (बिना मेहरम) यात्रेत सहभागी होणार आहेत. भविष्यात हवाई मार्गाबरोबरच जलवाहतुकीतूनही यात्रेला पाठविण्याचा विचार आहे. विमानसेवेच्या तुलनेत सध्या ही यात्रा परवडत नसल्याने त्याला अनुमती दिलेली नाही. त्याशिवाय खासगी टूर्स कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याने अशा आॅपरेटर्सचा समावेश काळ्या यादीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी हज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार हुसेन दलवाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.ए. खान आदी उपस्थित होते.
‘विरोधक गैरसमज निर्माण करीत आहेत’
नागरिक संशोधन कायदा (सीएए), एनआरसी, सीपीआरबाबत देशभरात होत असलेल्या विरोधाबाबत खात्याचे मंत्री म्हणून भूमिका काय, आंदोलकांची भेट घेणार का, असे विचारले असता त्यांनी भारतातील १३० कोटी जनता सुरक्षित आहे, त्याबाबत विरोधक गैरसमज निर्माण करीत आहेत, असे सांगितले. यावरून संकटात येण्याच्या भीतीने उभे राहात नक्वी पत्रकार परिषद गुंडाळून निघून गेले.
‘कोरोना’बाबत पुरेपूर दक्षता
‘कोरोना’ संसर्ग भाविकांना होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी करून प्रतिबंधात्मक औषधे दिली जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.ए. खान यांनी सांगितले.