Join us

यंदा दिवाळीत बदाम गोड, तर अंजीर कडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:05 AM

सुक्या मेव्याची मागणी कायम; महागाईची झळ नाही, इराणच्या बदामाचे दर कमी झाले तर अंजीरचे दर वाढले

- चेतन ननावरे मुंबई : दिवाळी फराळापासून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या सुक्या मेव्याला यंदाही ग्राहकांची तुफान पसंती मिळत आहे. महागाईच्या झळीपासून दूर राहिल्याने सुक्या मेव्याचे दर यंदा स्थिर असून, ग्राहकांकडून मोठ्या संख्येने खरेदी होत असल्याचे मशीद बंदर येथील विक्रेते देवेंद्र ठक्कर यांनी सांगितले. विशेषत: इराणच्या बदामाचे दर कमी झाले असून, अंजीरचे दर वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठक्कर म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने काजू, बदाम, पिस्ता, किशमिस, आक्रोड, अंजीर या सुक्या मेव्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. यंदा सुक्या मेव्याचे दर स्थिर असून, पदार्थांच्या दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली आहे. फक्त अंजीरची आवक घटल्याने, गतवर्षी १ हजार २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होणाºया अंजीरला यंदा १ हजार ४०० रुपयांचा दर आकारला जात आहे. याशिवाय १ हजार ६०० आणि २ हजार रुपये प्रति किलो दराचे अंजीरही बाजारात उपलब्ध आहेत. याउलट इराणहून बदामाची आवक वाढल्याने, गतवर्षी ३ हजार ६०० रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे बदाम ग्राहकांना यंदा अवघ्या २ हजार ४०० रुपयांत मिळत आहेत.बाजारात काश्मीरच्या आक्रोडला टक्कर देण्यासाठी चिली आणि कॅलिफोर्नियातील आक्रोड आले आहेत. मात्र, चांगल्या दर्जाचे आणि किमतीत स्वस्त असल्याने काश्मिरी आक्रोडला अधिक मागणी मिळत आहे. याशिवाय कॉर्पोरेट जगतामधून भेटवस्तू म्हणून सुक्या मेव्याला मोठी मागणी मिळत आहे. ग्राहकांना भेट म्हणून गिफ्टबॉक्समध्ये पॅकिंगमध्ये सुका मेवा देण्याची परंपरा कॉर्पोरेट जगतात सुरू झाली आहे. एका कागदी बॉक्ससाठी ५० ते ८० रुपयांपर्यंत अतिरिक्त दर आकारला जातो. याउलट लाकडापासून तयार केलेल्या एका बॉक्ससाठी कॉर्पोरेट्स ४०० ते ६०० रुपये मोजत असल्याची माहिती ठक्कर यांनी दिली.इराणी सुक्या मेव्याला मागणीइराणहून येणाºया बदाम, पिस्ता, जर्दाळू यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. दर्जाने उत्तम आणि किंमत कमी असल्याने, सुक्या मेव्याची कोट्यवधी रुपयांत उलाढाल मुंबईत होते. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवाळीपर्यंत हा बाजार १०० कोटी रुपयांची उलाढाल पार करेल, असे जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :दिवाळी