यंदा जवळपास सर्वच शाळांचा निकाल लागणार शंभर टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:20+5:302021-06-03T04:06:20+5:30
मूल्यमापनासाठी नववीच्या गुणांचा आधार; विद्यार्थी, पालकांची मात्र संमिश्र मते लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा ...
मूल्यमापनासाठी नववीच्या गुणांचा आधार; विद्यार्थी, पालकांची मात्र संमिश्र मते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा ५० टक्के आधार घेण्याच्या निर्णयासह शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षक गोंधळले आहेत. शाळा व्यवस्थापनावर निकाल लावण्याचा ताण येणार असला तरीही जिल्ह्यात पहिल्यांदाच जवळपास सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे इतके नक्की झाले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील मुंबई जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९३ टक्के तर पालिका शाळांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नववीतील उत्तीर्णतेचे प्रमाण ८६ टक्के होते. त्यामुळे यंदा दहावीत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षाच्या गुणांचा आधार मिळणार हे निश्चित आहे. साहजिकच यामुळे जिल्ह्याची ही उत्तीर्णतेची टक्केवारी वाढणार आहे.
शासनाच्या या निकालाबाबत विविध स्तरांवर मतमतांतरे आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर पालक मात्र निकालाची गुणवत्ता घसरणार या आणि प्रवेशात गोंधळ तर होणार नाही ना, याच चिंतेत आहेत. अनेक शाळांत लेखी परीक्षा, चाचण्या, तोंडी परीक्षाच झाल्या नाहीत तर मग या गुणांचे समानीकरण कसे करणार, असा प्रश्न शाळा आणि शिक्षकांना पडला आहे. पुढील काळात या परीक्षा झाल्या नसल्याने त्यांचे आयोजन गुण देण्यासाठी कसे करावे, हाही प्रश्न शाळा व्यवस्थापनांपुढे आहे.
अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहे. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे? असा सूर काही पालक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केला.
एकूणच शिक्षण विभागाच्या नवीन मूल्यमापन धोरणामुळे दहावीच्या निकालाची सर्व जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापकांसह शाळा प्रशासनावर येऊन पडल्याने आता तेही गोंधळले आहेत. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर जूनअखेरपर्यंत निकाल लावणेही अवघड होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा गोंधळ मार्गी लावून तातडीने अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
* असे असेल नवे सूत्र
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असेल. याअंतर्गत नववीत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी आणि २० गुणांकनाने तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज करण्यात येईल. या सर्वांची गोळाबेरीज करून विद्यार्थ्यांना दहावीचे गुण देण्यात येतील, असे सूत्र शिक्षण विभागाने न्यायालयात मांडले असून, यावर न्यायालयाचा अंतिम निर्णय गुरुवारी म्हणजे आज अपेक्षित आहे.
* आयटीआय तंत्रनिकेतनच्या निर्णयाची प्रतीक्षाच
अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी ऐच्छिक असणार असून आयटीआय, तंत्रनिकेतनातील प्रवेश हे दहावीच्या गुणांवरच अवलंबून असतात. यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, की काही नवीन पद्धत अवलंबली जाते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लाले आहे.
* विद्यार्थी गोंधळलेलेच
१. नववीच्या गुणांचे पन्नास टक्के घेणार म्हटल्यावर आमचं उत्तीर्ण होणं निश्चित आहे. पण अद्यापही सीईटीचा प्रारूप आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना आम्ही पुढच्या वर्गात जायची तयारी कशी करावी हेच समजत नाही.
- नम्रता जाधव, विद्यार्थिनी
२. आमच्या परीक्षांवर सुरू असलेल्या चर्चेने आता भीतीच वाटू लागली आहे. कधी परीक्षा द्या, कधी रद्द असं अनिश्चिततेचं वातावरण त्रासदायक आहे. एकच काय ते ठरवा आणि आम्हाला कळवा; पण सकाळ-संध्याकाळ या चर्चांनी खच्चीकरण होतंय.
- वरुण पवार, विद्यार्थी
* पालक काय म्हणतात?
१. कोविडमुळे सर्वत्रच गोंधळाची परिस्थिती मान्य आहे. शासनाने घेतलेला कोणताही निर्णय एकाच वेळी सगळ्यांना मान्य होईल असे अजिबात नाही. पण सामूहिक हिताचा निर्णय आणि तोही लवकर घेऊन मुलांच्या मनातील गोंधळ संपवावा. म्हणजे त्यांना पुढच्या तयारीसाठी वेळ देता येईल.
- अश्विनी जंगम, पालक
२. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का ठेवली? ती सक्तीची किंवा मग रद्दच करणं योग्य होते. यातून फक्त संभ्रम वाढला आहे.
- सुवर्णा कळंबे, पालक
* मुंबई जिल्ह्यातील दहावीची विद्यार्थीसंख्या
मुली - १,६९,१७४
मुले - १,९०,७३८
एकूण - ३,५९,९३५
...............................................