लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने यंदा होळी व धूळवड साजरी करण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले होते. मुंबईकरांनी होळी व धूळवडीचा सण नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा केला. त्यामुळे यंदा मुंबईत हाेळीचा रंग फिका असल्याचे पाहायला मिळाले.
होळीच्या दिवशी रविवारी अनेक ठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले. दरवर्षी मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये होळीचे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येते. यंदा मात्र काेराेनामुळे कोळीवाड्यांमध्ये कमी माणसांच्या उपस्थितीत तसेच गर्दी जमेल, अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता हाेलिकाेत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत रात्री ८ वाजल्यानंतर जमावबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी होळीदहनाच्या वेळी गर्दी जमू नये, यासाठी पोलिसांनी रात्री ८ वाजताच होळीदहनाचा कार्यक्रम उरकून घेण्यास सांगितले हाेते. यामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी रात्री ८ वाजताच होळीचे दहन करण्यात आले. होळीच्या पवित्र अग्नीपुढे कोरोनाचा नाश व्हावा, असे गाऱ्हाणे घालण्यात आले.
धूूळवड हा सण एकमेकांना रंग लावून तसेच नाचगाण्यांवर थिरकून जल्लाेषात साजरा केला जातो. मुंबईत अनेक इमारतींमध्ये, चाळींमध्ये तसेच रिसॉर्ट व मैदानांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात सहभागी होण्याकरिता हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. मात्र, हा सण साजरा करताना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राहत नसल्याने प्रशासनाने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर या सणावरही प्रशासनाने निर्बंध घातले होते. त्यामुळे यंदा धूळवड मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी न करता अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोणत्याही परिसरात गर्दी जमू नये, यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनीही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.