यंदाच्या पावसात हिंदमाता, भायखळा पूरमुक्त
By admin | Published: April 17, 2016 01:34 AM2016-04-17T01:34:48+5:302016-04-17T01:34:48+5:30
पावसाळ्यात हमखास पाण्याखाली जाणारे ठिकाण म्हणजे दादर पूर्व येथील हिंदमाता परिसऱ याचा परिणाम वाहतुकीवरही होत असल्याने दरवर्षी पालिकेची व नागरिकांचीही डोकेदुखी वाढते.
मुंबई : पावसाळ्यात हमखास पाण्याखाली जाणारे ठिकाण म्हणजे दादर पूर्व येथील हिंदमाता परिसऱ याचा परिणाम वाहतुकीवरही होत असल्याने दरवर्षी पालिकेची व नागरिकांचीही डोकेदुखी वाढते. मात्र ब्रिटानिया पर्जन्यजल पंपिंग स्टेशनमुळे या वर्षीपासून हिंदमाताच नव्हे तर भायखळा परिसरही पाणी साचण्याच्या तडाख्यातून सुटणार आहे़
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईत आठ पंपिंग स्टेशन बांधण्यात येत आहेत़ हाजी अली आणि ईला नाला पंपिंग स्टेशन काही वर्षांपूर्वीच कार्यान्वित झाली आहेत़ त्याचबरोबर उर्वरित पंपिंग स्टेशनचे काम संथगतीने होत कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत़ यापैकी ब्रिटानिया आऊटफॉल पंपिंग स्टेशन यंदाच्या पावसाळ्यात सुरु होणार आहे़
रेतीबंदर येथे बांधण्यात आलेल्या या पंपिंग स्टेशनमध्ये सहा पंप बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ २२०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर हे पंपिंग स्टेशन बांधण्यात येत आहे़ या केंद्राचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल़ त्यानंतर लवकरच हे केंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहिती संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प लक्ष्मण व्हटकर यांनी दिली़ (प्रतिनिधी)
या परिसरांना मिळणार दिलासा
ब्रिटानिया पंपिंग स्टेशनमुळे हिंदमाता परिसर, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मडकेबुवा चौक, आचार्य दोंदे मार्ग, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, अभ्युदय नगर, काळाचौकी, दत्ताराम लाड मार्ग, पेटीट लेन, जीजीभाई लेन, लालबाग, सरदार हॉटेल, भायखळा पूर्व़ या भागांत पाणी साचणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
असे असेल पंपिंग स्टेशन
उदंचन केंद्राची क्षमता ३६ घनमीटर क्युबिक मीटर प्रतिसेकंद इतकी राहणार आहे़
या केंद्रात सहा घनमीटर प्रति सेकंद क्षमतेचे सहा पंप असतील़
दादर पूर्व हिंदमाता सिनेमा परिसरातील पर्जन्य जल हे परळपासून डॉ़ आंबेडकर मार्ग, पुढे
बॅरिस्टर नाथ पै मार्ग, कमानी पेटिका नलिकाद्वारे ब्रिटानिया पातमुख येथे येऊन मिळणार आहे़
या उदंचन केंद्रापर्यंतचे जाळे हे सुमारे ५५ कि़मी़चे आहे़