यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:23 PM2020-07-03T18:23:17+5:302020-07-03T18:23:46+5:30
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,यंदाचा दि,22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्तींची उंची 3 ते 4 फूट ठेवावी.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,यंदाचा दि,22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्तींची उंची 3 ते 4 फूट ठेवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळांना अलिकडेच केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विलेपार्ले व अंधेरी येथील सुमारे 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहिर केले होते.तर यंदा लालबागच्या राजाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत सर्वाजनिक गणेश मूर्त्या या 2400 च्या आसपास असून घरगुती गणेश मूर्त्यांची संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे.यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि गणपती विसर्जनाला चौपाटी,तलाव,नदी याठिकाणी होणारी गणेश विसर्जनाची मोठी गर्दी आणि कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात करण्याची मागणी मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.मुंबईतील अनेक नागरिकांच्यावतीने आपण पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करून कृत्रिम तलावाची संकल्पना यंदा मोठ्या प्रमाणात राबवण्याची सूचना वजा विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
कृत्रिम तलावाची संकल्पना डॉ.शुभा राऊळ यांनी सर्वप्रथम 2006 साली त्यांच्या दहिसर येथील प्रभागात आणि नंतर 2008 साली त्या मुंबईच्या महापौर असतांना त्यांनी ही संकल्पना महापौर बंगल्यात सुरू केली होती. आता या योजनेला मुंबईत दरवर्षी प्रतिसाद वाढत असून कृत्रिम तलावांची संख्या देखिल वाढत आहे. मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कृत्रिम तलाव किंवा सिंटेक्सच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच 3 ते 4 फूट सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा पालिकेने ता त्या भागातील जवळच्या मैदानात उपलब्ध करुन घ्यावी. तसेच पर्यावरण संस्थांनी याकामी सहकार्य करावे असे मत त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. मुंबईसह महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची संकल्पना राबवण्यासाठी राज्यातील 27 महानगर पालिकांमध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.