Join us  

यंदाही दरडीचे सावट कायम

By admin | Published: May 23, 2014 3:27 AM

पावसाळ्यात नेतिवली टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका यंदाही कायम राहण्याची चिन्हे आहेत.

प्रशांत माने, कल्याण - पावसाळ्यात नेतिवली टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका यंदाही कायम राहण्याची चिन्हे आहेत. दरड कोसळून ७ जण जखमी झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असताना येथील संरक्षक भिंत बांधण्याचे कामही काही ठिकाणी अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शेकडो कुटुंबांना जीव मुठीत धरूनच वास्तव्य करावे लागणार आहे. टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर वसाहत असून त्या ठिकाणी सुमारे साडेचारशे कुटुंबे राहत आहेत. टेकडीवरही मोठ्या प्रमाणावर घरे आहेत. पावसाळ्यात माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना या ठिकाणी वारंवार घडत असतात. २००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. तीन वर्षांपूर्वी तिघांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. मार्च २०१४ मध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून ७ जण जखमी झाले होते. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने शेकडो कुटुंबीयांच्या मनात भीती पसरलेली असते. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, आजवर ५० टक्केच काम झाले आहे. कचोरे परिसरातील धोकादायक ठिकाणी भिंत बांधून झाली आहे. परंतु, त्याच्या पाठीमागील भागात भिंत बांधण्याचे काम निधी मंजूर होऊनही सुरू झालेले नाही. स्थानिक नगरसेवक कैलास शिंदे यांनी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली होती. प्रत्येक पावसाळ्यात रहिवाशांना सतर्कतेच्या आणि स्थलांतरित होण्याच्या सूचना केडीएमसी प्रशासनाकडून केल्या जातात़ परंतु, संरक्षक भिंत घालण्याचे काम अद्याप त्यांच्याकडून पूर्ण झालेले नाही. या कामाला गती येण्यासाठी आणखी किती बळींची आवश्यकता आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.