एमएडच्या यंदा ६५ टक्क्यांहून अधिक जागा राहिल्या रिक्त; प्रवेशांकडे विद्यार्थ्यांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:06 AM2019-12-13T05:06:46+5:302019-12-13T05:07:13+5:30
एमपीएड, बीपीएड अभ्यासक्रमांना पसंती
मुंबई : राज्यात एमएड अभ्यासक्रमाच्या ६५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत, तर उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील ७ अभ्यासक्रमांच्या एकूण १४ हजार ४१० जागा यंदा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक शिक्षणाप्रमाणेच उच्च शिक्षण विभागातील एम.एड., एलएलबी - ५ वर्षे, बीए/ बीएसस्सी बी.एड. या अभ्यासक्रमांसाठी कमी प्रवेश झाल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या.
राज्यातील उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या यंदाच्या वर्षातील प्रवेश परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या सीईटी सेलच्या अखत्यारीत येत असल्याने नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागातील एलएलबी ३ वर्षे, एलएलबी ५ वर्षे, बी.एड., एम.एड., बीपी.एड., एमपी.एड., बीए/ बीएसस्सी बी.एड. या अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांची संख्या समोर आली आहे.
एलएलबी ३ वर्षांच्या राज्यातील १५ हजार १०० जागांपैकी १४ हजार ५६० जागांवर प्रवेश निश्चिती झाली असून ५४० जागा रिक्त आहेत. तर एलएलबी ५ वर्षांच्या १० हजार ३१९ जागांपैकी ५०३७ जागांवर प्रवेश झाले असून ५ हजार २८१ जागा रिक्त आहेत. एलएलबी ३ वर्षांच्या ९६ टक्के जागांवर प्रवेश झाले असून एलएलबी ५ वर्षांच्या केवळ ४८.८१ टक्के जागा भरल्या आहेत.
बी.एड.च्या यंदा ३२ हजार ८१५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८५.५९ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. तर एम.एड.च्या केवळ ३४.८५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यंदाच्या वर्षी एम.एड. अभ्यासक्रमासाठी २ हजार ९९५ जागा उपलब्ध होत्या. राज्यभरातील महाविद्यालयांत या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त असल्याने वाढीव मुदत देऊन जादा फेरीही सीईटी सेलकडून राबविण्यात आली होती.
बीपी.एड.च्या ३१.४१ टक्के जागा रिक्त असून एमपी.एड.च्या रिक्त जागांची संख्या १०.७२ टक्के इतकी आहे. एकूणच साध्या एम.एड.पेक्षा विद्यार्थी एमपी.एड. आणि बीपी.एड. अभ्यासक्रमांना अधिक पसंती देत आहेत. बीए/बीएसस्सी बी.एड. आणि बी.एड. एम.एड. अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बीए/ बीएसस्सी बी.एड.च्या राज्यात ५३० जागा उपलब्ध होत्या. त्यातील ५१.५० टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शिवाय बी.एड. एम.एड.च्याही केवळ ३४ टक्के जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली आहे.
सात अभ्यासक्रमांच्या १४,४१० जागा रिक्त
एम.एड. अभ्यासक्रमाच्या ६५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असून उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील ७ अभ्यासक्रमांच्या एकूण १४,४१० जागा यंदा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. बी.एड., एम.एड. केल्यानंतरही कमी रोजगाराच्या संधी आणि यंदा प्रवेशासाठी लेटमार्क तसेच तांत्रिक अडचणींचा एलएलबी ५ च्या प्रवेशांना बसलेला फटका याचा परिणाम प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्यावर झाल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.