Join us

यंदा परीक्षा नकोच ...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:59 PM

उशिरा निकालाचा परिणाम पुढील प्रवेश प्रक्रियेवर आणि जॉब अपॉर्च्युनिटीवर होणार; सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी मांडली मते आणि दिल्या प्रतिक्रिया

सीमा महांगडे

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परिस्थितीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परीक्षा घेऊच नये असे स्पष्ट मत राज्यातील , देशातील विद्यार्थ्यांनी मांडले आहे. त्याऐवजी ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी वर्षाच्या शेवटच्या निकालासाठी वर्षभरातील अंतर्गत गुण आणि आत्ता झालेले सेमिस्टचे गुण यांच्या सरासरीचा विचार करण्यात यावा अशी सूचना विद्यार्थ्यांकडून सरकारसमोर मांडण्यात आली आहे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक बिघडलेले असताना महाविद्यालयीन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना  हे जाणून घेण्यासाठी मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका अदिती सावंत यांनी गुगल फॉर्मद्वारे सर्वेक्षण घेतले ज्यामध्ये देशभरातील आणि देशाबाहेरील विद्यार्थ्यांनी ही या काळातील परीक्षांबाबत आपली मते मांडली आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय झाला असला तरी अद्याप महाविद्यालयीन परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षांबाबत निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थी अस्वस्थ असून सरकार काय निर्णय घेणार याची वाट पाहत आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या निर्देशांनंतर परीक्षांबाबत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान प्राध्यापिका आदिती सावंत यांनी विद्यार्थ्यांची या संदर्भातील नेमकी मते जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार करून ती सर्वत्र वितरित केली. २८ एप्रिल रोजी वितरित करण्यात आलेल्या प्रश्नावलीला केवळ १२ तासांत ४०५९ हुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. यावरून या विषयाची संवेदनशीलता किती आहे हे जाणून त्यांनी या सर्वेक्षणावरून काही निष्कर्ष काढले.कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने परीक्षा घेण्यास ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी नापसंतीच दर्शविली. या दरम्यान ते परीक्षा देण्याच्या मानसिकतेतच नाहीत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने करण्यास त्यांना असुरक्षित वाटते, त्यांचे पालक त्यांना बाहेर जाऊच देत नाहीत या कारणांमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आपला नकारच दर्शविला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे पोट हातावर असल्याने सध्याच्या परिस्थितीनंतर त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वातावरण अनुकूल नसल्याचे सांगितले. ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या घरात कॉम्प्युटर व इंटरनेट नसल्याची माहिती दिली. तसेच त्यांना ऑनलाईन परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग नसल्याचे सांगत याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होऊ शकत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. शेवटच्या वर्षीच्या अनेक विद्यार्थ्यांनी उशिरा लागणार असलेल्या निकालाचा फटका त्यांच्या पुढील प्रवेशाना आणि भविष्यात मिळणाऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीला बसणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले असून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत याना या सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांची मते विचारात घ्यावी आणि मगच आपला निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. सर्वेक्षणातील काही मुद्दे- ९३. ५ % विद्यार्थ्यांनी या काळात परीक्षा नको असे मत नोंदविले आहे- ८७.१ % विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावरही आपण परीक्षेच्या मानसिक स्थितीत नसणार असे म्हटले आहे.- ९६. १% विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षित नसल्याचे वाटते.-३३. ७ % विद्यार्थी हे परगावी आहेत.- ६७. १ % विद्यार्थ्यांनी स्वतःला क्वारंटाईन केल्याचे सांगितले आहे.- ३६. ३ % विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप तर ४.२ % विद्यार्थ्यंकडे स्मार्टफोन नाही . ४४. ५ % विद्यार्थ्यांकडे घरी वाय फाय नाही- ५८ % विद्यार्थ्यांना उशिरा निकालाचा परिणाम पुढील प्रवेशांवर होण्याची शक्यता आहे.- ६२. २ % विद्यार्थ्यांना हे निकाल त्यांना भविष्यातील नोकरीत अडथळा ठरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :परीक्षाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस