यंदा लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक नाहीच, मंडळाचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:16 PM2021-09-09T13:16:23+5:302021-09-09T13:17:26+5:30
लालबागचा राजा मंडळाकडून यंदा कुठलाही फर्स्ट लूक सादर करण्यात येणार नाही. त्यामुळे, भक्तांना मुखदर्शन घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे. मंडळाने अधिकृत ट्विटरवरुन यांसदर्भात माहिती दिली आहे.
मुंबई - यंदाच्या गणेशोत्सवात तरी लालबागच्या राजाचे दर्शन मिळणार का, याबाबत संभ्रमाची अवस्था आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यापूर्वीच शासनाच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. गणेशमूर्तीची उंची कमी करतानाच, चरणस्पर्श अथवा स्टेजवर जाणारी रांग यंदा नसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता, यंदा लालबागचा राजाचा फर्स्ट लूकही सादर होणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
लालबागचा राजा मंडळाकडून यंदा कुठलाही फर्स्ट लूक सादर करण्यात येणार नाही. त्यामुळे, भक्तांना मुखदर्शन घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे. मंडळाने अधिकृत ट्विटरवरुन यांसदर्भात माहिती दिली आहे. 'आम्ही कोणताही फर्स्ट लूक सादर केलेला नाही. यंदा मंडळाच्या अधिकृत यूट्यूब, फेसबुक आणि वेबसाईटवर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता थेट लालबागचा राजा 2021 ची पहिली झलक पाहायला मिळणार आहे, त्यासाठी आम्हीही उत्साहित आहोत,' असे ट्विट मंडळाने केले आहे.
We have not performed any first look.
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 8, 2021
We all are excited to give you the first glance of Lalbaugcha Raja 2021 on 10th September 10:30 am live on Mandal's official YouTube, Facebook and Website.
Ganpati Bappa Morya!!!#lalbaugcharajapic.twitter.com/dzdoM2Kmhw
गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सिने कलावंतांसह विविध पक्षांचे राजकीय नेतेही राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, मागच्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव साजरा करणार नसल्याची भूमिका घेतली. त्या ऎवजी आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम घेण्यात आले. यंदाच्या वर्षी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने मंडळाने विविध उपाययोजना करतानाच आवश्यक तयारीही केली आहे.
गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून अलीकडेच जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियम पाळत, शारीरिक अंतर राखून गणेश दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लालबागचा राजा मंडळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य सर्व मंडळांसाठी असलेली परवानगी लालबागचा राजासाठीही लागू राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शारीरिक अंतराचे पालन करत मुखदर्शन घेता येणे शक्य आहे. मुखदर्शन मार्गावरील प्रवेशाचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग मोठा आणि प्रशस्त आहे. शिवाय, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रवेश नियंत्रित करणेही शक्य आहे. मात्र, गर्दी होईल, असा पोलिसांचा अंदाज असून याबाबत प्रशासनाकडून कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही.
पोलीस प्रशासनासोबत सुरु आहे चर्चा
मागच्या वर्षीच्या आरोग्य उत्सवानंतर यंदा नियमांचे पालन करत उत्सव साजरा करण्याची भूमिका मंडळाने घेतल्याचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आमची तयारी झालेली आहे. महापौरांच्या उपस्थितीत अलीकडेच पालिका प्रशासनासोबत आमची ऑनलाइन बैठकही झाली आहे. पोलीस प्रशासनासोबतही चर्चा सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरे करावेत असे आवाहनही सातत्याने केले