विद्यार्थ्यांचा कल जाणून घेणारी कलचाचणी यंदा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:25+5:302021-02-12T04:07:25+5:30
समुपदेशकांची घेणार मदत ; करिअरला योग्य दिशा देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सीमा महांगडे मुंबई : यंदा कलचाचणीऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील ...
समुपदेशकांची घेणार मदत
सीमा महांगडे
मुंबई : यंदा कलचाचणीऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील डाएटमध्ये असणाऱ्या प्रशिक्षित समुपदेशाकडून विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे, हे विविध क्षमता चाचण्यांच्या आधारे समजून घेतले जाईल आणि त्याच पद्धतीने पालक, विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल, असा शिक्षण विभागाचा मानस असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरचा कल समजावून घेण्याऐवजी त्यांची बौद्धिक, भावनिक क्षमता समजावून घेऊन त्यांच्या भविष्यासंदर्भातील निर्णयाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न यंदा शिक्षण विभाग करत असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून दहावीनंतरचा विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे ? त्यांची आवड कशात आहे हे समजून घेण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कलचाचणी घेतली जात होती. यासाठी श्यामची आई फाउंडेशन या खासगी संस्थेची मदत घेतली जात होती. शिवाय महाकरिअरमित्रसारख्या ॲपची निर्मितीही करण्यात आली होती.
मात्र कलचाचणीतून समोर येणाऱ्या निकालातून विद्यार्थ्यांचा कल आणि प्रत्यक्षात असलेली अभिरुची यात कमालीचा फरक दिसून आल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे या कलचाचणीच्या निकालाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी होणार नसल्याची टीका पालक व विद्यार्थ्यांसह तज्ज्ञ व शिक्षकांकडूनही करण्यात येत होती. कल जाणून घेण्यासाठी आवश्यक चाचण्या तज्ज्ञांकडून प्रमाणित करून समुपदेशकांकडून त्यांचे कल विद्यार्थ्यांना योग्यपद्धतीने कसे समजावून दिले जातील या प्रयत्नात शिक्षण विभाग असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
* विद्यार्थ्यांना कलचाचणी हवी मात्र परीक्षेनंतर
यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असल्याने दरवर्षी परीक्षेआधी घेतल्या जणाऱ्या कलचाचणीबाबत १५. ९ टक्के विद्यार्थ्यांनी यंदा कलचाचणी घेऊ नये, असे मत एका सर्वेक्षणात व्यक्त केले आहे, तर २९.४ टक्के विद्यार्थ्यांना ती पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना यासंदर्भात अद्याप काहीच मार्गदर्शक सूचना न मिळाल्याने ३७.८ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. १७ टक्के विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी बोर्डाच्या परीक्षेनंतर घेण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे.
* ऑफलाइन चाचण्या घेण्याची तयारी करावी
राज्य शासनाने सर्वप्रथम कलचाचणी निर्माण करणाऱ्या आयव्हीजीएस संस्थेचे पुनरुज्जीवन करावे. शिक्षक समुपदेशक संख्येचा अभाव दूर करण्यासाठी संस्थेच्या आठही विभागीय कार्यालयामार्फत गेली पाच वर्षे बंद केलेले समुपदेशक प्रशिक्षण पुन्हा सुरू करावे. समुपदेशकांनी केलेल्या रास्त मागण्या विचारात घ्याव्यात. सद्य:स्थितीत ऑनलाइन कलचाचणीचा विचार न करता सर्व डाएट समुपदेशकांमार्फत ऑफलाइन चाचण्या घेण्याची तयारी करावी. त्यासाठी सदर संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या समुपदेशकांची विशेष नेमणूक करावी.
- जयवंत कुलकर्णी , समुपदेश व शिक्षक