गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा ‘आवाज’ झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:35 AM2017-10-22T02:35:08+5:302017-10-22T02:35:10+5:30
दिवाळी आणि आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी असे समीकरण आहे, परंतु आता ध्वनिप्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर फटाक्यांचा आवाज कमी व्हायलाच हवा, हे मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागले आहे.
मुंबई : दिवाळी आणि आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी असे समीकरण आहे, परंतु आता ध्वनिप्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर फटाक्यांचा आवाज कमी व्हायलाच हवा, हे मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गेली दोन वर्षे फटाक्यांचा आवाज कमी होत असल्याचे ‘आवाज फाउंडेशन’ने केलेल्या नोंदीतून उघडकीस आले आहे.
आवाज फाउंडेशनने वांद्रे,
जुहू चौपाटी, वरळी सी फेस, गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राइव्ह
परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री फटाक्यांच्या आवाजाची नोंद घेतली. नोंदीनुसार, रात्री १२च्या दरम्यान मरिन ड्राइव्ह येथे सर्वाधिक ११७.८ डेसिबल आवाजाची नोंद झाली. आवाज फाउंडेशनच्या संचालिका सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले की, मुंबईकर जागरूक होऊ लागल्याने मागील चार वर्षांपासून सातत्याने फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होत आहे.
अनेक लोक हल्ली मोठ्या आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी, रंगीबेरंगी फटाक्यांना प्राधान्य देतात. त्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण कमी होते. परंतु, हे फटाके मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण करतात. त्यामुळे हे फटाके वाजवणेही बंद करणे, ही काळाची गरज आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांविषयीच्या जनजागृतीमुळे मुलांमध्ये फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
अब्दुलाली यांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून सातत्याने फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होत आहे. आवाजाची पातळी कमी होत आहे. मुंबईकर जागरूक होऊ लागले आहेत. शासनाने आणि विविध सामाजिक संस्थांनी केलेली जनजागृती, शासनाने घातलेले विविध निर्बंध आणि त्याची अंमलबजावणी, यामुळेच गेल्या चार वर्षांत ध्वनिप्रदूषण कमी झाले आहे.
>गेल्या काही वर्षांतील फटाक्यांच्या सर्वाधिक आवाजाची नोंद
वर्ष आवाज
२००७ १३०
२००८ १३७
२०१२ १२७
२०१३ १२४
२०१४ ११८
२०१५ १२३
२०१६ ११८
२०१७ ११७.८