यंदाच्या दहीहंडीला राजकीय ‘फ्लेवर’; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदांची बडदास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:05 AM2018-09-04T04:05:39+5:302018-09-04T04:05:48+5:30
मुंबापुरीची ओळख असलेला दहीहंडी हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच शहर-उपनगरात गोविंदांची लगबग सुरू असलेली दिसून आली. सर्वप्रथम आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी दिल्यानंतर गोविंदा इतर हंड्या फोडण्यासाठी रवाना झाले.
मुंबई : मुंबापुरीची ओळख असलेला दहीहंडी हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच शहर-उपनगरात गोविंदांची लगबग सुरू असलेली दिसून आली. सर्वप्रथम आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी दिल्यानंतर गोविंदा इतर हंड्या फोडण्यासाठी रवाना झाले. ट्रक, टेम्पो आणि दुचाकीहून गोविंदा हंडीच्या ठिकाणी दाखल होत होते. तेथे थरावर थर रचत हंड्या फोडल्या जात होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी गोविंदा पथकांची बडदास्त ठेवल्याचे चित्र सर्वत्र होते. यंदा चांगली बक्षिसे देण्याबरोबरच गोविंदा पथकांच्या येण्या-जाण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत सर्व सोय राजकीय पक्षांनी केली असल्याचे काही पथकांच्या प्रतिनिधींनी सांगितले. बोरीवली, घाटकोपर, दादर, चेंबूर, वरळी आणि इतर परिसरात हंड्या फोडण्यासाठी दाखल झालेल्या गोविंदांच्या उत्साहात भर घालण्यासाठी हिंदी, मराठी गाण्यांची रेलचेल सुरू होती. कुठे सहा, कुठे सात, तर कुठे नऊ थरांच्या सलाम्या देण्यात आल्या. यंदा बऱ्याच मंडळांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी जमविला. तर काही राजकीय नेत्यांनी समाजभान जपून हंडी रद्द करून, खर्चाची रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला. एकंदर शहर-उपनगरातील दहीहंडीच्या वातावरणाचा ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा...
दादरमध्ये इक्रोफ्रेण्डली हंडी
दादर येथील छबिलदास मार्गावर इक्रोफ्रेण्डली हंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक स्टॉलच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी तीन मानाच्या हंड्या उभारण्यात आल्या होत्या.
एक हंडी मराठी वाहिन्यांवरील कलाकारांनी, दुसरी विक्रोळी क्रीडा केंद्र मंडळाच्या महिला पथकाने आणि तिसरी हंडी दिव्यांग व्यक्तींनी फोडली.
यंदा मंडळाच्या महिला पथकाने आयडियलची दहीहंडी फोडून त्यांच्या ‘संघर्षा’त मानाचा तुरा रोवला. विक्रोळी क्रीडा केंद्र मंडळ मागील १५ वर्षांपासून आयडियलची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यांना अपयश होत होते.
पावसाची बगल
दादर पश्चिमेकडे रानडे रोड येथे राजकीय हंड्या उभारण्यात आल्या. पाऊस नसल्याने पाण्याचे फवारे गोविंदांवर उडविण्यात आले. कांजूर, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, वडाळा या भागात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘राधा राधा राधा... माझी राधा कुठे गेली बघा’ ही गाणी सर्वत्र वाजत होती. पूर्व उपनगरातील अनेक पथके मुंबई शहरासह ठाण्यात जाऊन यश मिळवित होती. भायखळा काळाचौकी येथील दहीहंडी मंडळात आरती सोलंकी उपस्थित होती.
केरळ पूरग्रस्तांना १ लाख रुपयांची मदत
ताडदेवच्या ए.सी. मार्केटमध्ये जय भवानी सेवा मंडळाने ४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांच्या एकूण पारितोषिकाच्या हंडीचे आयोजन केले होते. या वेळी बक्षिसांच्या रकमेशिवाय आणखी १ लाख रुपयांची मदत केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक अरुण दूधवडकर यांनी दिली.
अरुण दूधवडकर म्हणाले, या ठिकाणी थरांचे बंधन नसून, मोठ्या संख्येने सामील झालेल्या गोविंदा पथकांनी तीन थरांपासून सात थर रचले. तसेच १४ वर्षांखालील गोविंदा थरावर चढण्यास मनाई केली असून, उन्हापासून गोविंदांना दिलासा मिळावा, म्हणून पाण्याच्या फवाºयाची व्यवस्था केलेली आहे.
पाच थरांचे बंधन
कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये, म्हणून फक्त पाच थर लावण्याचे बंधन ठेवल्याची माहिती आयोजक नागेश नांदोस्कर यांनी दिली. नांदोस्कर म्हणाले, पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी हंडीचे आयोजन केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा गोविंदा जखमी होऊ नये, म्हणून थरांचे बंधन लादण्यात आले आहे.
सलामी देणाºयांना रोख बक्षिसे
कुर्ला येथील भाभा रुग्णालयासमोरील उत्कर्ष मित्रमंडळाच्या दहीहंडीला पाच थर लावणाºया मंडळांना १ हजार, तर ६ थर लावणाºया मंडळांना २ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. आयोजक संजय पवार यांच्यासहित गणेश नखाते, कुर्ला पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. कुर्ला पूर्व नेहरूनगर येथे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये सलामी देणाºया मंडळांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दहीहंडीमध्ये हंडी फोडण्यासाठी थर रचणाºयांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
राजकीय पक्षांनी वाटून घेतली गल्ली
दहीहंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरमध्ये तर प्रत्येक गल्लीतील दहीहंडी एकेका पक्षाने वाटून घेतली होती. दहीहंड्यांचा परिसर राजकीय पक्षांचे झेंडे व लांबलचक पट्ट्यांनी व्यापून गेला होता. गोविंदा पथकांच्या टी-शटर््सवरही राजकीय पक्षांची जाहिरातबाजी दिसत होती. साहजिकच, दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय धुळवडीचे स्वरूप आले होते.
यंदा दरवर्षीच्या तुलनेत दादर परिसरातली गर्दी आटल्याचे दृश्य होते. त्यामुळे येथे होणारी धक्काबुक्की व चेंगराचेंगरी यंदा जाणवली नाही. आधीच सोमवार असल्याने दादर परिसरातील दुकाने बंद होती; त्यातच दहीहंडीमुळे दादरचे फेरीवाले गायब झाले होते. परिणामी, दादरचे पदपथही मोकळे होते.
नृत्याचीही कदर : काळाचौकी येथे भाजपा वॉर्ड अध्यक्ष राकेश जेजुरकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात नयनरम्य गोविंदा नृत्य सादर करणाºया सिकंदर स्पोर्ट्स क्लब गोविंदा पथकास भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण यांनी अतिरिक्त रक्कम देत गौरविले. उत्सव साजरा करताना परंपरा जपायलाच हवी, असे मधू चव्हाण या वेळी म्हणाले.
पहिली सलामी शहिदांना
संस्कार प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहिसरच्या मानाच्या हंडीत पहिली सलामी शहीद जवानांना देण्यात आली. दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन येथे सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या कार्यक्रमात शहीद शुभम् सूर्यकांत मुस्तापुरे कुटुंबीय उपस्थित होते. ही हंडी दहिसर पूर्वेच्या एकवीरा गोविंदा पथकाने फोडली. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते मुस्तापुरे कुटुंबीयांना ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन मानवंदना देण्यात आली. या वेळी आयोजक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.
दृष्टिहीन गोविंदांनी रचले चार थर
महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येत तयार केलेल्या दृष्टिहीन तरुणांच्या गोविंदा पथकाने मुंबईतील विविध ठिकाणच्या दहीहंडीला सलामी दिली. दृष्टिहीन तरुणांनी अतिशय ‘डोळस’पणे रचलेल्या थरांंना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पाच वर्षांपूर्वी तरुणांनी एकत्र येत या मंडळाची स्थापना केली असून राज्यातील हे पहिले दृष्टिहीन गोविंदा पथक असल्याचा दावा केला आहे. नंदू धनावडे व प्रसाद गायकवाड हे प्रशिक्षक या गोविंदांना प्रशिक्षण देतात. या पथकामध्ये शीव, ठाणे, दिवा येथील दृष्टिहीन तरुणांचा समावेश आहे. सोमवारी या पथकाने माझगाव, वरळी बीडीडी चाळ, सेना भवन, दादर व ठाण्यातील विविध ठिकाणी जाऊन ४ थर लावून सलामी दिली.
गोविंदांची धावपळ
दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात सकाळपासून गोविंदा मंडळांचे सदस्य शहर व उपनगरात विविध ठिकाणी फिरत होते. पाच, सहा, सात थर लावून सलामी देणाºया मंडळांना रोख रकमेचे बक्षीस दिले जात असल्याने, दिवसभरात सलामी देणाºया मंडळांची एका ठिकाणाकडून दुसºया ठिकाणी धावपळ सुरू होती.
कुर्ल्यात मोठी गर्दी
कुर्ला रेल्वे स्थानकालगत भारत टॉकीज येथे दहीहंडी उभारण्यात आली होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे शहर आणि उपनगरातील अनेक गोविंदा पथकांनी दाखल होत थरावर थर रचत हंडी फोडली. कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील बैलबाजार नाका येथे उभारण्यात आलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची विशेषत: परिसरातील गोविंदा पथकाची मोठी गर्दी झाली होती.
सोशल मीडियावर
गो.. गो.. गोविंदा
जन्माष्टमीनिमित्ताने सोशल मीडियावर गोकूळ दिसले. नेटकºयांनी एकमेकांना दहीहंड्यांच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर दहिकाला साजरा केला. व्हॉटस्अॅप स्टेटस्वर दहीहंडीवर आधारित गाणी ठेवण्यात आली होती. टिष्ट्वटरवर #दहीहंडी, #जन्माष्टमी, #गो.. गो..गोविंदा, #हॅप्पी जन्माष्टमी २०१८ असे हॅशटॅग खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. अनेक युजर्सनी बालगोविंदाचे फोटो अपलोड केले. सेलिब्रेटींनी दहीहंडी साजरी केल्याचे फोटो पोस्ट केले. मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाच्या दहीहंडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
गोपिकांचीही आघाडी
मुंबई : शहर-उपनगरात गोविंदासह गोपिकांनीही हंडी फोडण्यात आघाडी घेतलेली दिसून आली. कुलाबा येथील नवमहाराष्ट्र महिला गोविंदा पथकाने फोर्ट येथे पाच थर लावून सलामी दिली. तर भायखळा ताराबाग येथे स्थानिक गोपिकांनी पहिल्यांदाच उत्सवात सहभागी होऊन मानाची हंडी फोडली. गेल्या काही वर्षांमध्ये स्वस्तिक गोविंदा पथक असो वा पार्ले स्पोर्ट्स क्लबचे महिला पथक असो या पथकांचा आदर्श घेऊन अनेक गोपिकांनीही या उत्सवात उडी मारली. आज शहर-उपनगरातील